LIVE UPDATES

कोळंब ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

सरपंच, ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 16:56 PM
views 71  views

सिंधुदुर्गनगरी : कोळंब ग्रामपंचायत आर्थिक व्यवहार प्रकरणी शासनाची फसवणूक करणे, ग्रामपंचायत दस्तऐवज मध्ये फेरफार करणे, ग्रामसभेचे बनावट इतिवृत्त तयार करणे या होणाऱ्या गैर कारभाराबाबत सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा या मागणीसाठी कोळंब ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मालवण तालुक्यातील कोळंब येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी उपसरपंच विजय नेमळेकर, सदस्य संजना शेलटकर, नंदा बावकर, ज्येष्ठ नागरिक गुरुदास परब, सुमन भोजने, दिलीप नेमळेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोळंब गावाने निवडून दिलेले विद्यमान सरपंच हे लोक हिताची कामे न करता ग्रामपंचायत निधीत अपहार, भ्रष्टाचार, दस्तऐवजमध्ये फेरफार करणे व बनावट कागदपत्रांचा समावेश करणे अशा पद्धतीचा चुकीचा कारभार गेली ४ वर्षे करत आहे. यात वेळोवेळी नेमलेल्या ग्रामसेवकांचा समावेश आहे.

तसेच १६ जून २०२६ रोजी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणी' मध्ये कोळंब ग्रामपंचायत आर्थिक अपहाराबाबत सरपंच, ग्रामसेवक यांनी रक्कम ८४,००० रुपये भरले असून तत्कालीन ग्रामसेवक प्रकाश सुतार यांची पूर्ण वसुली झाली नसताना विस्तार अधिकारी पंचायत समिती मालवण यांनी १ लाख २२ हजार वसुल केल्याबद्दल खोटी माहिती पत्राद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुनावणी दरम्यान दिली.

चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाईसह पदावरुन हटवण्याची कारवाई तातडीने करण्यात यावी. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी उपोषण केले त्यावेळी आमच्या तक्रारीबाबत १० दिवसांत कारवाई करण्याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी यांनी तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे उपोषण आम्ही तात्पुरते स्थगित केले होते. परंतु त्यानंतर  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून कुठलीच ठोस कायदेशीर कारवाई न केल्यामुळे त्यांचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी व संबंधितावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज ३० सप्टेबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदस्य, ग्रामस्थ व जेष्ठ नागरिकांसहीत उपोषणास बसावे लागले आहे .या आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे . 

कोळंब ग्रामपंचायत अपहाराबाबत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर यांचे १७ जुलै २०२६ रोजी आदेश होऊन आजमितीपर्यंत सरपंच व ग्रामसेवक यांचेवर फौजदारी गुन्हा नोंद नाही. तसेच सरपंचावर कलम ३९ (१) अन्वये कारवाई करण्यात आली नाही.

कोळंब ग्रामपंचायत हद्दीत २३ नं. मुळ रजिस्टर मुळ दस्तऐवजामध्ये फेरफार तसेच खाडाखोड करुन कातवड मुख्य रस्ता ते श्रृंगारेवाडी येथे जाणारा रस्ता या नोंदीत रुंदी ४ मीटर वरुन ६ मीटर व परमानंद कदम घर ते कोरगावकर घर या रस्त्याची लांबी २०० मी. वरुन ५०० मी. केली गेली.

याबाबत शासन निर्णयाप्रमाणे सरपंच यांचेवर फौजदारी कारवाई सोबत कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात यावी. २६ जानेवारी२०२५ रोजी ग्रामसभा न घेता सरपंच व ग्रामसेवक यांनी बनावट इतिवृत्त तयार केले असल्याचे उघड झाले आहे .तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिशाभूल करणारा अहवाल दिलेबाबत जिल्हाधिकारी यांनी योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.