LIVE UPDATES

दुष्काळजन्य परिस्थितीच्या आढाव्यासाठी संनियंत्रण समिती गठित

मंत्री नितेश राणेंचा समावेश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 30, 2026 11:43 AM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन उपाययोजना सुचविणे आणि परिस्थितीचे संनियंत्रण करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या ११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मंत्री नितेश राणे यांचा समावेश करण्याचा निर्णय २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्देशानुसार घेण्यात आला आहे. यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीच्या आढाव्यात मत्स्यव्यवसायाशी संबंधित बाबींचाही समावेश होणार आहे.

राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेणे, आवश्यक उपाययोजना सुचविणे तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही उपसमिती कार्य करणार आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून मंत्री नितेश राणे यांचा समितीत समावेश महत्त्वाचा ठरला आहे.

 मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आलेला असल्याने दुष्काळी परिस्थितीचा परिणाम होणाऱ्या मच्छिमार आणि मत्स्य उत्पादकांच्या प्रश्नांकडेही या समितीच्या माध्यमातून लक्ष देता येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांसाठी आवश्यक मदत व उपाययोजनांबाबतच्या निर्णयप्रक्रियेत मंत्री नितेश राणे यांचा सहभाग राहणार आहे.