LIVE UPDATES

पेंडूरच्या मातीचा डंका साताऱ्यापर्यंत!

आरव दत्तात्रय पाटीलची कुस्तीच्या आखाड्यात दमदार कामगिरी; जिल्ह्यात प्रथम क्रमांक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 18:00 PM
views 29  views

मालवण : कुस्तीच्या आखाड्यात ताकद, चपळाई आणि जिद्दीची सांगड घालत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा विद्यार्थी आरव दत्तात्रय पाटील याने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. आरवने प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत आपल्या कौशल्याची चमक दाखवली आणि पेंडूर हायस्कूलचा झेंडा जिल्हास्तरावर उंचावला. त्याच्या या शानदार विजयामुळे क्रीडा क्षेत्रात पेंडूरच्या नावाची पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.

या उल्लेखनीय यशाची पुढची पायरी म्हणजे सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आरवची निवड झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण पेंडूरचे लक्ष साताऱ्यातील त्याच्या पुढील कामगिरीकडे लागले आहे.

आरवच्या यशाबद्दल क्रीडा शिक्षिका अर्चना देसाई, मुख्याध्यापक सुरेश कृष्ण तावडे, संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे, संस्थेचे सचिव घन:श्याम राणे, क्रीडा शिक्षिका, सर्व संस्था पदाधिकारी व्यवस्थापन समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले असून, विभागस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.