LIVE UPDATES

एसआयआर मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नागरिकांना अनावश्यक त्रास

जयंत बरेगार यांचा प्रशासनावर सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 17:55 PM
views 19  views

सावंतवाडी : मतदार यादी पुनर्नरीक्षण एस. आय. आर सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया आवश्यक आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, तिच्या अंमलबजावणीत सामान्य नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे अस मत सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, आपला मुलगा चेतन बरेगार यास आलेल्या सुनावणीच्या नोटीसमध्ये वडीलांच्या नावात तफावत आहे एवढेच लिहिले आहे. तफावत नेमकी काय आहे ? हे नोटीसमध्ये कुठेही नमूद नाही. त्या मुद्द्यासमोरील चौकोन ही रिकामा आहे. 2019 ला मतदानावेळी दिलेल्या मतदान स्लिपमध्ये आणि त्याच सालात मला निवडणूक आयोगाकडून दिलेले ओळखपत्र यात माझे नाव जयंत राघवेंद्र बरेगार असे स्पष्ट व बरोबर लिहिली आहे. यामुळे माझ्या मुलाच्या वडीलांच्या नावात तफावत कोठे आली ? हे स्पष्ट होत नाही.

याकरिता मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सावंतवाडी नगरपरिषद सावंतवाडी यांच्याकडे विशेष सखोल निरीक्षण नोटीस अन्वये तफावतीचा तपशील व संबंधित कागदपत्रांच्या मूळ प्रति मीळाव्यात, याबाबत अर्ज केला आहे. ही सुनावणी आठ ऑक्टोबर रोजी नेमलेली असल्यामुळे मला पाच ऑक्टोबर पर्यंत कागदपत्रे मिळावेत. अन्यथा, सुनावणी पुढे ढकलून त्याची तारीख मला कळवावी असे त्यात नमूद केले आहे.

अशी नोटीस मिळाल्यावर ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्र जमविणे कार्यालयात चकरा मारणे आणि ठरलेल्या वेळी सुनावणीस हजर राहणे हे मोठे मनस्तापाचे ठरते. आम्ही सुनावणीस हजर राहू आणि सर्व कागदपत्रे देऊ. पण, प्रशासनाकडून नोटीस मधील तफावतीच्या स्पष्ट तपशील द्यावा जो आताच्या नोटीस मध्ये दिलेलं नाही.

जुन्या यादीतील स्पष्ट लेखनिक चुका असल्यास ,सध्याच्या ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे प्रशासनाने स्वतः पडताळून दुरुस्त्या कराव्यात तसेच सुनावणीपूर्वी माहिती मिळवण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष असावा. नागरिकांचे हक्क जपण्यासाठी ही प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी एवढीच अपेक्षा असून ज्यांना अशा नोटिसा येतील त्यांनी नगरपालिकेत जाऊन त्रुटी बाबत खात्री होणे करता, लेखी अर्ज द्यावा.

आपल्या चुकीने त्रुटी झाली नसल्यास, ज्यांच्या चुकीने त्रुटी उद्भवले आहे त्यांना ती निभावून देणे भाग पाडावे. कोणतीही निवडणूक जवळ नसली तरी लोकप्रतिनिधी यांनी देखील याकडे लक्ष द्यावे व सामान्य नागरिकाला होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल असे सहकार्य करावे असे आवाहन श्री. बरेगार यांनी केलं.