
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये सर्वसामान्य नागरिक आपल्या कामासाठी आल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांच्या कामात त्रुटी काढल्या जातात. एका कागदाची पूर्तता केल्यानंतर दुसऱ्या कागदाची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार नगरपंचायतीचे हेलपाटे मारावे लागत आहेत. दुसरीकडे बड्या व्यक्तींची कामे तातडीने कशी होतात, असा सवाल उपस्थित करत ‘नगरपंचायतीच्या नावाखाली आपली दुकानं थाटून बसले आहेत,’ असा खळबळजनक आरोप स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी केला. कर्मचारी पेमेंट करतानाही दहा-दहा हजार रुपयांचे पेमेंट कमी केले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी हरिदत्त माने, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते. नगरपंचायत स्वनिधी, शववाहिनी, वॉटर एटीएम, ठेकेदारांकडून दहा टक्के निधीची वसुली तसेच ऑडिटमधील मुद्द्यांवरून ही सभा चांगलीच वादळी ठरली.
ठेकेदारांकडून वसुली का होत नाही?
सन २०१६ पासून ऑडिटमध्ये ठेकेदारांकडून वसुली करण्याचे मुद्दे उपस्थित होत असतानाही अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल नगरसेवक नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला. ठेकेदारांकडून सरसकट वसुली करण्याचे आदेश असतानाही ऑडिटच्या अहवालानुसार कारवाई का केली जात नाही? याबाबत विचारणा केल्यानंतर सभागृहात लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जाते, असा आरोपही त्यांनी केला.
नगरपंचायत प्रशासनाकडून ऑडिटमधील सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे नगरपंचायतीला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे बांदेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी या विषयावर सर्व नगरसेवक आक्रमक झाले.
बीच स्वच्छतेच्या १ लाख ३५ हजारांच्या निधीचा हिशेब द्या
सेवा सप्ताह अभियानांतर्गत देवगड बीच स्वच्छता मोहिमेसाठी १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नेमकी कोणती कामे करण्यात आली, याचा सविस्तर हिशेब सभागृहासमोर मांडावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. सूत्रसंचालन आणि व्हिडिओसाठी दहा हजार रुपये खर्च झाल्याचे केवळ बिलांच्या आधारे सांगणे पुरेसे नाही. प्रत्यक्षात कोणते काम झाले, त्याची सविस्तर माहिती सभागृहाला देण्यात यावी. त्यानंतरच संबंधित खर्चाला मंजुरी देण्यात येईल, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगरपंचायत इमारतीच्या सुशोभीकरणासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिली. या निधीतून नगरपंचायतीचे सुसज्ज सभागृह, स्वच्छतागृह तसेच इतर आवश्यक कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साडेचार वर्षांपासून वॉटर एटीएम बंदच; ठोस तारीख द्या!
देवगड व जामसंडे येथे साडेचार वर्षांपूर्वी वॉटर एटीएम बसविण्यात आले. या वॉटर एटीएमच्या विषयावर आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली. मात्र, अद्यापही दोन्ही वॉटर एटीएम सुरू झालेली नाहीत. रस्ता रुंदीकरणाचे कारण देत स्थलांतराचा विषय पुढे केला जात असल्याने सभागृहात नगरसेवक आक्रमक झाले.
या प्रकल्पावर निधी खर्च होऊन साडेचार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता या विषयावर केवळ चर्चा न करता जनतेच्या सेवेसाठी दोन्ही वॉटर एटीएम नेमक्या किती दिवसांत सुरू करणार, याची ठोस तारीख प्रशासनाने द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
स्वनिधी असूनही ‘पैसे नाहीत’ असे का सांगितले जाते?
देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातून वीज, पाणीपट्टी, विविध परवानगी दाखले आदींच्या माध्यमातून महसूल जमा होतो. हा महसूल नगरपंचायतीच्या स्वनिधीत जमा होतो. त्यातून खर्चही केला जातो. मात्र, एखाद्या कामासाठी स्वनिधीत पैसे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते आणि त्याच विषयाची वारंवार चर्चा का निर्माण होते, असा सवाल नगरसेवक बांदेकर यांनी केला.
सध्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला एक फॉगिंग मशीन उपलब्ध झाली आहे. मात्र, एका फॉगिंग मशीनच्या माध्यमातून १७ प्रभागांमध्ये आवश्यक ती फॉगिंगची कामे पूर्ण होतील का? तसेच एका फॉगिंग मशीनसाठीही नगरपंचायतीच्या स्वनिधीत निधी उपलब्ध नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेली पाच वर्षे नगरपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक त्या योजना करण्याच्या सूचना आपण सातत्याने देत आहोत. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप का होत नाही, असा सवालही बांदेकर यांनी केला.
चार वर्षांपासून शववाहिनीचा प्रश्न प्रलंबित
देवगड-जामसंडे शहरासाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी चार वर्षांपूर्वी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, अद्यापही जागेचा प्रश्न पुढे करून शववाहिनीची सेवा सुरू झालेली नाही. आवश्यक जागेची पूर्तता करून देवगड व जामसंडे शहरासाठी शववाहिनी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
पवनचक्की गार्डनवरील शुल्काला विरोध
देवगड पवनचक्की गार्डन येथे सध्या प्रवेश शुल्क आकारण्यास आपला विरोध असल्याचे नगरसेवक नितीन बांदेकर यांनी सांगितले. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्रथम व्यवस्थित रस्ता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतरच गार्डनवर शुल्क आकारण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सदर जागा खासगी असल्याने जागामालक पर्यटकांकडून पार्किंगच्या नावाखाली पैसे घेत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने या ठिकाणच्या जागेचे व्यवस्थित सर्वेक्षण करावे आणि त्यानंतरच गार्डन पाहण्यासाठी शुल्क आकारण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना बांदेकर यांनी केली.
देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रात कायद्याची अंमलबजावणी का होत नाही, याबाबतही नगरपंचायत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










