LIVE UPDATES

पितळीचा गुच्छ सोन्याचा भासवत ५ लाखांची फसवणूक

वेंगुर्ल्यात दोन भामट्यांविरोधात गुन्हा ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 30, 2026 12:17 PM
views 67  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

​वेंगुर्ला :  आईच्या औषधोपचाराचे कारण सांगून पितळीचा गुच्छ सोन्याचा असल्याचे भासवत तब्बल ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वेंगुर्ला येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता या दोन्ही आरोपींचा तीव्रतेने शोध घेत आहेत.  

वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार (गुन्हा रजि. नं. ५२/२०२६, भारतीय न्याय संहिता - BNS कलम ३१८(४), ३(५)), संशयित आरोपींनी तक्रारदाराला (फिर्यादी) आपल्या आईच्या औषधपाण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी फिर्यादीला सोन्याच्या माळेचा गुच्छ गहाण ठेवण्याच्या बहाण्याने दिला आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून रोख ५ लाख रुपये घेतले.  ​

मात्र, नंतर तपासणी केली असता तो सोन्याचा गुच्छ नसून पितळेचा असल्याचे उघडकीस आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तात्काळ वेंगुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.  

 याप्रकरणी संशयित आरोपी बुराराम बागरी व  मुकेश कुमार बागरी यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ​या दोन्ही संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी वेंगुर्ला पोलिसांनी जाहीर आवाहन केले आहे. छायाचित्रातील हे संशयित आरोपी कुठेही दिसून आल्यास किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ 

​वेंगुर्ला पोलीस ठाणे (जि. सिंधुदुर्ग): ०२३६६-२६३४३३ , ​तपासी अधिकारी (शेखर दाभोलकर): ९४०५८३१७१२, ​प्रभारी अधिकारी (श्री. निसर्ग ओतारी): ९५२७९५३७००  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.