LIVE UPDATES

सावंतवाडीत जिल्हा अजिंक्यपद कुमार गट कबड्डी निवड चाचणी

राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्याचा संकल्प
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 17:48 PM
views 18  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशन व जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडीच्या वि.स. खांडेकर हायस्कूलच्या मैदानावर कुमार गट सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली.

या स्पर्धेला देवगड, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, दोडामार्ग, मालवण अशा जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 20 वर्षाखालील कुमार गटाची ही एक दिवसीय स्पर्धा होती.

पालघर येथील एक कोटीच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची येत्या 8 ते 10 ऑक्टोबर रोजी पालघर येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या भव्य कोकण विभागीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या स्पर्धेचा खर्च सुमारे एक कोटी रुपये असणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय कबड्डीपटू सागर बांदेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, "सावंतवाडीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन होत आहे ही चांगली बाब आहे. यातून निश्चितच चांगले खेळाडू राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर चमकतील." यावेळी व्यासपीठावर जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, जिल्हा कबड्डी फेडरेशनचे कार्याध्यक्ष माजी सभापती संजय पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, मंडळाचे सचिव अजय जाधव, खजिनदार गणेश जाधव, सौ. लक्ष्मी दादा जाधव, देवगड नगरसेवक सुभाष धुरी, मुख्याध्यापक वाय. एन. उबाळे, मार्टिन अल्मेडा, उदय जाधव, दिनेश चव्हाण, भूषण केळकर, लखन पासवान, हरिश्चंद्र साळुंखे, राहुल ठोसके, सी.एल. नाईक, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते. 

यावेळी उमाकांत वारंग म्हणाले, "राष्ट्रीय कबड्डीपटू विजय जाधव यांनी सावंतवाडीचे नाव देशपातळीवर नेले. त्यांच्यासारखेच काम आता अजय व गणेश जाधव व त्यांची टीम करत आहे. अशा कुमार गट स्पर्धा भरवून एक क्रीडा चळवळ उभी करण्याचा आमचा संकल्प आहे. ही मुले पालघर येथील स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावर खेळतील." यावेळी सभापती प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर व ॲड. संतोष सावंत यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.स्पर्धेचे सूत्रसंचालन कबड्डीपटू दिनेश चव्हाण यांनी केले.