LIVE UPDATES

कथित जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिरात सहभाग नोंदवू नये

जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 13:15 PM
views 41  views

सावंतवाडी : कबड्डीप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पालक यांनी  सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या २६ जुलै २०२६ रोजी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी आयोजित कथित "जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबीर" बाबत सावध राहावे. शिबीर आयोजित करणाऱ्या संस्थेबाबत धर्मादाय सहआयुक्त, कोल्हापूर यांनी पारित केलेल्या आदेशानुसार आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधदुर्ग यांच्या आदेशाने सन २०१६ ते २०२७ या कालावधीसाठी संबंधित संस्थेचा  PTR रद्द करण्यात आलेला आहे. अशा अनधिकृत उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवू नये, तसेच कोणत्याही प्रकारचे शुल्क भरू नये असे आवाहन जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ही संस्था रद्द करण्यामागे विविध कारणे असून स्पोर्टकोडचे उल्लंघन, संस्थापक अध्यक्षांना हयात असताना मयत दाखविणे, आर्थिक गैरव्यवहार, जिल्हा संलग्न तालुका असोसिएशन बेकायदेशीर अशा विविध कारणास्तव सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामुळे सर्व कबड्डी खेळाडू, पंच, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी व पालकांनी अशा अनधिकृत उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवू नये, तसेच कोणत्याही प्रकारचे शुल्क भरू नये, तसेच कबड्डी स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या विविध संस्थांनादेखील या माध्यमातून आवाहन करण्यात येते की, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी यांच्यासहकार्याने कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊ नये. कबड्डी खेळाशी संबंधित अधिकृत प्रशिक्षण, पंच परीक्षा किंवा अन्य उपक्रमांची माहिती केवळ नोंदणीकृत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन, सावंतवाडी यांच्याकडूनच घेण्यात यावी असे आवाहन आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अरविंदेकर यांनी केले आहे.