
वेंगुर्ले : रेडी गावची ग्रामदेवता तसेच ‘कोकणची अंबा’ म्हणून ख्याती असलेल्या श्री देवी माऊली मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून, आज सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी भेट देत श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. सप्ताह उत्सवानिमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. यावेळी देवस्थानचे विश्वस्त संदीप राणे, जि. प आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सरपंच रामसिंग राणे यांनी श्रीफळ देऊन पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचा सन्मान केला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जाधव, रेडी पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
रेडीच्या श्री देवी माऊली मंदिराला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून, ‘कोकणची अंबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊलीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची श्रद्धेने वर्दळ असते. सप्ताह उत्सवामुळे सध्या रेडी गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे.










