
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी व कुटुंबीयांचा स्नेह मेळावा आज शरद भवन, ओरोस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डचे संचालक मा. श्री. सतीश मराठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. बँकेने मागील पाच वर्षात केलेल्या कामकाजाच्या आढावा पुस्तिकेचे प्रकाशन मा. सतीश मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास बँकेचे अध्यक्ष. मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे, प्रकाश मोरये, आत्माराम ओटवणेकर, गणपत देसाई, रवींद्र मडगावकर, विठ्ठल देसाई, सौ.नीता राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, कर्मचारी संचालक सुनील फणसेकर, देवेंद्र धुरी, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटक मंत्री संजय पाचपोर, महाराष्ट्र राज्य काजू महामंडळ संचालक तथा सहकार भारती कोकण विभाग प्रमुख धनंजय यादव, सहकार भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शैलेश दरगोडे, संघटन प्रमुख शरद जाधव, जिल्हा बँकेचे सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सतीश मराठे म्हणाले*, "भारतात गेल्या १०-१२वर्षात आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भारताचा बँकिंग सेक्टरचा ग्रोथ नॅशनल ग्रोथपेक्षाही चांगला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक विकास झपाट्याने होईल, असा माझा विश्वास आहे. पूर्वी शेती १००% पावसावर अवलंबून होती, आज ५५-६५% शेती सिंचनाखाली आली आहे."
"भारताचे फायनान्शियल इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी प्रयत्न झाले. आज पब्लिक सेक्टर बँका प्रायव्हेट बँकांच्या तोडीस तोड नफा कमवत आहेत. गेल्या ८ वर्षात जन-धन खात्यांमुळे ५० कोटी लोक औपचारिक बँकिंगमध्ये आले. यामुळे रिटेल क्रेडिट ग्रोथ वाढला. २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, हा मोठा अॅस्पिरेशनल वर्ग आहे. गेल्या ४-५ वर्षात ५ कोटी नवीन लघु उद्योजक उभे राहिले आहेत. ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहार वाढतील आणि इकॉनॉमीचे फॉर्मलायझेशन होईल. सहकारी संस्थांनी आपल्या सभासदांना आयुष्मान भारत सारख्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोहीम राबवावी," असे आवाहन त्यांनी केले.
*यावेळी बोलताना अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले,* "या बँकेचा प्रत्येक कर्मचारी मनापासून काम करतो. आदरणीय शिवरामभाऊ जाधव आणि ढोलम साहेबांनी या बँकेच्या वाटचालीसाठी जी रूपरेषा आणि कामाची पद्धत ठरवून दिली, त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो. सिंधुदुर्ग ही महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असूनही, दुप्पट-तिप्पट वय असलेल्या मोठ्या जिल्हा बँकांना मागे टाकून आम्ही स्पर्धेत आघाडीवर आहोत. रत्नागिरी, रायगड सारखे मोठे जिल्हे असताना, पतसंस्था, साखर कारखाने, सुतगिरण्या नसतानाही केवळ वैयक्तिक ग्राहकांपर्यंत पोहोचून विश्वास संपादन केल्याने व्यवसाय वाढवता आला."
"आम्ही जिल्हा बँक असलो तरी अर्बन आणि प्रायव्हेट बँकेसारखे बँकिंग करतो. इतर जिल्हा बँका आता इंडिव्हिज्युअल बँकिंगकडे वळत आहेत, पण आम्ही हा प्रयोग १०-१५वर्षांपूर्वीच सुरू केला. आज आमची CBS यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. पाच वर्षात व्यवस्थापन खर्च २.३५% वरून १.७१% पर्यंत कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळेच नवीन कर्मचारी भरती आणि शिपाई भरती शक्य झाली. महाराष्ट्रात सलग तीन वर्षे सर्वात आधी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणारी बँक म्हणून आमचा नावलौकिक आहे. १जुलै हा आमचा स्थापना दिवस आणि AGM चा दिवस असेल, अशी शिस्त आम्ही लावली आहे. "वही-पेनावर काम करणारा आमचा कर्मचारी आज CBS सिस्टिमवर आत्मविश्वासाने काम करतो, हीच आमची खरी ताकद आहे. या यशात कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांचेही मोठे योगदान आहे," असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले* कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "विकास संस्था आणि दूध संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने चांगले प्रयत्न केले आणि ते कर्मचाऱ्यांमुळेच शक्य झाले. मी शाखेत जातो तेव्हा मला अभिमान वाटतो. सकाळी 10 वाजता शाखा व्यवस्थापक काउंटरवर हजर असतो. एकदा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता कणकवलीत जात असताना पाहिले, सगळ्यांच्या घरी गणपती असतानाही आमचा शाखा व्यवस्थापक बँक उघडत होता."लॉकडाऊन काळात अनेक बँकांचा व्यवसाय कमी झाला, कर्मचारी येत नव्हते. पण मला सांगायला आनंद होतो की लॉकडाऊनच्या वर्षातही आमच्या बँकेचा व्यवसाय वाढला. इतर ठिकाणी गर्दी कमी होत असताना आमच्या शाखांमध्ये महिला सन्मान निधी, गॅस सबसिडी, शेतकरी सन्मान निधीचे पैसे काढण्यासाठी लोक रांगेत उभे होते. लोकांचा विश्वास होता की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत पैसे नक्की मिळतील. हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केले त्यानी बँक कामकाजाची प्रगती नमुद करून बँक प्रगतीपथावर नेण्याचे आमचे प्रयत्न यापुढे सुरू राहील त्याला सर्वांनी साथ द्यावी असे ते यावेळी म्हणाले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बँकेच्या वतीने शरद सावंत यांनी केले.या स्नेहमेळाव्याच्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.










