LIVE UPDATES

कोचरा गावाला सेवाभावी व समर्पित वृत्तीने काम करणारा सरपंच लाभला : शंकर घारे

सुसज्ज व्यायामशाळा, ग्रामपंचायत इमारत सुशोभीकरणासह विविध विकासकामांचं लोकार्पण व भूमिपूजन
Edited by:
Published on: August 16, 2026 21:21 PM
views 61  views

वेंगुर्ला : कोचरा गावातील नागरिक समाधानी आहेत. कारण या गावाला योगेश तेली यांच्यासारखा सेवाभावी आणि समर्पित वृत्तीने काम करणारा सरपंच लाभला आहे. गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करून विविध विकासकामे मार्गी लावणाऱ्या सरपंच योगेश तेली यांच्या कार्याचे कौतुक आहे.“राजकीय स्पर्धेपेक्षा विकासकामांची स्पर्धा झाली पाहिजे,” असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी केले.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कोचरा येथे जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास निधी, ग्रामविकास विभागाच्या २५/१५ योजनेसह विविध योजनांतर्गत मंजूर व पूर्ण झालेल्या विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, सरपंच योगेश तेली, तसेच शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, विभागप्रमुख मितेश परब, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, म्हापण सोसायटीचे चेअरमन आनंद गावडे, म्हापण ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, निवृत्त नायब तहसीलदार सुभाष चौधरी, पथसंस्था चेअरमन यशवंत गोसावी, माजी उपसरपंच आनंद गावडे ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार, विशाल वेंगुर्लेकर, संजय गोसावी, पूजा नांदोस्कर, प्रगती राऊळ, उर्मिला खडपकर, सुनिता परब, स्वरा हळदणकर, पंचायत अधिकारी सौरभ राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात कोचरा-म्हापण मुख्य रस्ता ते श्री वाघोबा मंदिर रस्ता काँक्रीटीकरण या सुमारे १० लाख रुपये खर्चाच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कोचरा गावातील पर्यटनस्थळे व वॉटर स्पोर्ट्सची माहिती दर्शविणाऱ्या फलकांचे अनावरण, ग्रामपंचायत इमारतीचे सुशोभीकरण आणि ग्रामपंचायत इमारतीत उभारण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सभापती शंकर घारे म्हणाले की, कोचरा हे तालुक्यापासून काहीसे दूर असलेले गाव असले तरी गेल्या काही वर्षांत सरपंच योगेश तेली यांनी गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणून विकासकामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायतीची इमारत, रस्ते, व्यायामशाळा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात येणारी कामे ही गावाच्या विकासाची दिशा निश्चित करणारी आहेत. सरपंच म्हणून काम करताना तेली यांनी गावाच्या विकासाला प्राधान्य दिले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक झाले पाहिजे. शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी योगेश तेली यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, गेल्या काही वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनातून कोचरा गावात विविध विकासकामे आणण्यात आली आहेत. गावाची लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येथे निधी आणणे आणि विकासकामे उभी करणे ही महत्त्वाची बाब आहे. सरपंचांनी लोकांशी सातत्याने संपर्क ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही कौतुकाची बाब असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षकी पेशातून समाजकारणाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. या प्रवासात योगेश तेली यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपसभापती सचिन देसाई यांनी आपल्या गावात विकास खेचून आणणारा माणूस तेवढ्यात ताक्तीचा लागतो याच उत्तम उदाहणार म्हणजे योगेश तेली. सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यावर सुद्धा तुमचे मार्गदर्शन नेहमी या गावसाठी राहूदे. या मतदार संघाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देसाई म्हणाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचा सरपंच योगेश तेली, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

सरपंच योगेश तेली यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी विविध कामे करण्याचा प्रयत्न सुरू असून, या कामांमध्ये वैयक्तिक हितापेक्षा गावाचा विकास हाच केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी कोणतेही काम केलेले नाही. गावाचा विकास हाच माझा उद्देश असल्याची भूमिका त्यांनी मांडली.