LIVE UPDATES

श्रावणी सोमवारी कुणकेश्वर मंदिरात पहाटे ५ ला पहिली पूजा

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 21:42 PM
views 23  views

देवगड  : देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता श्री कुणकेश्वर मंदिरात श्री कुणकेश्वराची प्रथम पूजा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी तसेच प्रसिद्ध उद्योजक संजय लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते होणार आहे. श्रावणी सोमवारनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून विविध लोकहितार्थ व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर परिसरात मंडप उभारून दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवकांचेही नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक सोमवारी मंदिरात विविध भजन मंडळांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दानशूर देणगीदारांच्या सहकार्याने मोफत साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना श्री कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासोबतच प्रसादाची सुविधाही उपलब्ध होणार आहे. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उपस्थित राहून स्वयंभू श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे.