
वेंगुर्ला : महाराष्ट्रातील काजू उद्योगाची ओळख देशपातळीवर निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या वेंगुर्लेच्या काजू उद्योगाचा जयपूर येथे झालेल्या ऑल इंडिया कॅशु असोसिएशनच्या तीन दिवसीय सेमिनारमध्ये गौरव करण्यात आला. ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी झालेल्या या सेमिनारमध्ये महाराष्ट्र कॅशु असोसिएशनचे अध्यक्ष तथा वेंगुर्ले येथील ज्येष्ठ काजू उद्योजक श्री. सुरेश बोवलेकर यांनी महाराष्ट्रातील काजू उद्योगाची ऐतिहासिक वाटचाल देशभरातील काजू उद्योजकांसमोर मांडली.
ऑल इंडिया कॅशु असोसिएशनचे अध्यक्ष राहुल कामत, सचिव श्री. रामकी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, देशातील विविध राज्यांचे कॅशु असोसिएशनचे अध्यक्ष तसेच काजू उद्योजक या तीन दिवसीय सेमिनारला उपस्थित होते.
वेंगुर्लेपासून देशभर पोहोचलेला काजू उद्योग
काजू उद्योगाचा इतिहास सांगताना सुरेश बोवलेकर यांनी महाराष्ट्रातील वेंगुर्ले येथून काजू उद्योगाच्या झालेल्या सुरुवातीवर प्रकाश टाकला. वेंगुर्ले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने काजू उद्योगाला दिलेले योगदान, या उद्योगाची झालेली प्रगती तसेच काजू प्रक्रिया उद्योगामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
वेंगुर्ल्याचा काजू उद्योग हा केवळ स्थानिक व्यवसाय न राहता त्याने देशातील काजू उद्योगाला दिशा देण्याचे काम केले आहे. या ऐतिहासिक वाटचालीची माहिती देशातील विविध राज्यांतून आलेल्या उद्योजकांना देताना वेंगुर्ल्याची काजू उद्योगातील ओळख अधोरेखित झाली.
महाराष्ट्रातील उद्योजक एकसंघ राहणार
“देशातून काजूगराची निर्यात करण्यावर आणि देशात मोठ्या प्रमाणावर काजूची लागवड करण्यावर या सेमिनार मध्ये भर देण्यात आला.” दरम्यान काजू उद्योगाच्या भविष्यातील वाटचालीसाठी देशातील सर्व उद्योजकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्रातील काजू उद्योजक यापुढेही ऑल इंडिया कॅशु असोसिएशनसोबत एकसंघपणे राहतील. अशी ग्वाही सुरेश बोवलेकर यांनी दिली.
काजू उद्योगासमोरील विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविणे, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आणि उद्योगाला देश-विदेशातील बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जयपूर येथील या सेमिनारमध्ये महाराष्ट्र कॅशु असोसिएशनचे अध्यक्ष तथा वेंगुर्ले येथील ज्येष्ठ काजू उद्योजक सुरेश बोवलेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. काजू उद्योगातील त्यांचे योगदान तसेच महाराष्ट्रातील काजू उद्योजकांना संघटित करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
काजू उद्योगाच्या विकासावर सखोल मंथन या तीन दिवसीय सेमिनारमध्ये काजू उद्योगाच्या विकासाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. काजू उत्पादन व प्रक्रिया उद्योगासमोरील आव्हाने, उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजना, बाजारपेठेतील बदल, उद्योजकांच्या समस्या तसेच भविष्यातील संधी यावर देशभरातील उद्योजकांनी विचारांची देवाणघेवाण केली.
देशातील काजू उद्योग अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक करण्यासाठी विविध राज्यांतील काजू उद्योजकांमध्ये समन्वय वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि एकत्रितपणे उद्योगाच्या हितासाठी काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
जयपूर येथील या सेमिनारच्या निमित्ताने वेंगुर्ल्याच्या काजू उद्योगाचा इतिहास आणि महाराष्ट्राचे काजू क्षेत्रातील योगदान देशपातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित झाले, तर सुरेश बोवलेकर यांच्या सन्मानामुळे वेंगुर्लेच्या काजू उद्योजकतेचा गौरव झाला.










