
वेंगुर्ला : शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छतेसाठी अडचणीचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेने मोकाट जनावरांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेदरम्यान रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या मोकाट जनावरांना नगरपरिषदेमार्फत ताब्यात घेऊन गोशाळेत हलविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या जनावरांच्या मालकीबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नगरपरिषदेने भटक्या गायी, वासरे व बैलांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट (परावर्तित पट्टे) घालण्यास सुरुवात केली आहे. वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशात हे पट्टे चमकल्यामुळे अंधारातही जनावरे वाहनचालकांना स्पष्टपणे दिसणार असून, संभाव्य अपघात टाळण्यास यामुळे मदत होणार आहे.
जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट न सोडता सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास संबंधित मालकांवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई (नियोजन) उपविधी २०१५ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या या मोहिमेस सहकार्य करावे आणि आपल्या मालकीची जनावरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.












