
कणकवली : रस्त्यालगत झाडे व त्याला जाळी न लावताच बिल काढण्यात आले आहे. ॲपवर माहिती घेऊन बिले तयार करू नका तर प्रत्यक्षात वस्तुस्थिती बघा आणि बिले करा. तालुक्यातील 'त्या' रस्त्यांलगत झाडे व त्याला जाळ्या बसलेल्या असतील तर मी सभागृहात येणार नाही, असे खुले आव्हान सदस्य लक्ष्मण गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात रस्त्यांना झाडे लावण्यासाठी चार कोटींची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे ॲपवर माहिती देऊ नका. प्रत्यक्षात झाडे दाखवा, खोटी माहिती देत सभागृहाची फसवणूक करू नका, अशा शब्दात सदस्य लक्ष्मण गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन व पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन तालुक्याचा चार कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा पाणी टंचाई आराखडा सभेत मंजूर करण्यात आला.
कणकवली पंचायत समितीची मासिक सभा प. पू.भालचंद्र महाराज सभागृहात सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व जि. प. चे माजी सभापती एस. टी. सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेचा आदर राखत कणकवली पंचायत समितीने वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने कणकवली पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सरपंच , ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांच्या अभिनंदन चा सदस्य लक्ष्मण गावडे यांनी ठराव मांडला. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करत असताना हळवल व परिसरातील गावातील मुख्य रस्त्यालगत लावलेली झाडे व त्याच्या संरक्षणासाठी जाळी बसविणे हा मुद्दा चर्चेत आला. मागील सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी पुढील सभेत माहिती घेऊन उत्तर देतो असे सांगितले होते.
मात्र इतिवृत्त वाचनामध्ये मोगम उत्तर दिल्याचे दिसून आल्याने सदस्य लक्ष्मण गावडे यांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी चार कोटीची निविदा करण्यात आली आहे. हा तीन वर्षे चालणारा कार्यक्रम आहे. याची संपूर्ण माहिती आपण माहिती अधिकाराअंतर्गत घेतली आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करू नका, असे लक्ष्मण गावडे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली उपविभागामार्फत एकूण कामाच्या 20% रकमेचे बिल देण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्या रस्त्यांवर किती झाडे लावली, त्याचे किती पेमेंट केले याची संपूर्ण माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी असे लक्ष्मण गावडे यांनी सांगितले.
कलमठ गावच्या दोन्ही बाजूला गडनदी व जानवली नदी अशा दोन नद्या आहेत. गावातील काही निवासी संकुलांचे सांडपाणी या नद्यांच्या पात्रांमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतील नळयोजना विहिरीतील पाणी दुषीत होणार आहे, असे सदस्य गुरुनाथ वर्देकर यांनी सांगितले. संबंधित निवासी संकुलांचे मालकांना केवळ नोटीस पाठवून काही होणार नाही तर या विषयाचा गांभीर्याने विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले.
देवगड - निपाणी मार्गावर झाडे पडून दोघांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सदस्य सहदेव खाडे यांनी केली. जलतारा योजनेसाठी 40 गुंठे क्षेत्र असणे आवश्यक आहे, ही अट शिथिल करण्यात यावी,अशी मागणी सदस्य लक्ष्मण गावडे यांनी केली. हळवल फाटा येथे लावण्यात आलेला हायमास्ट एक महिन्यातच नादुरुस्त झाला असल्याचा व्हिडिओ लक्ष्मण गावडे यांनी सभागृह दाखविला. हुंबरट उर्दू शाळेच्या शिक्षकाला देवगड येथे कामगिरीवर पाठविण्यात आले आहे. आपण चार वेळा शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधूनही उपाययोजना झालेली नाही असे सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले याविषयी सभापती उपसभापती व सर्व सदस्यांनी एकत्रित शिक्षणाधिकारी कार्यालयात जाण्याचे ठरविण्यात आले.
ओझरम गावातील धरणाला गळती नसल्याचे लेखी उत्तर पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले. बीएसएनएलचा कासार्डे - ब्राह्मणवाडी येथील टॉवर लवकर उभारण्यात यावा, असे सदस्य सहदेव खाडे यांनी सांगितले. विशेष शाळा स्वच्छता अभियान 18 ते 31 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येत असून त्याची पूर्वतयारी 24 ऑक्टोबर पर्यंत करायची असून प्रत्यक्षात काम 25 ते 31 ऑक्टोबर मध्ये करायचे असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्री गवस यांनी दिली.
'गाव तिथे क्रीडांगण' योजना गावागावात राबविण्यात यावी, असा लेखी प्रश्न बबलू सावंत यांनी दिला होता. त्यावर उत्तर देताना बीडीओ अरुण चव्हाण यांनी प्रस्ताव द्या, असे ग्रामपंचायतींना कळविले आहे. असे सांगितले. पाणीटंचाई आराखडा मंजुरीसाठी सभागृह ठेवण्यात आला त्यावर बोलताना आराखडा सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क सादर करण्यात आला आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता यांनी सांगितले. पाणीटंचाई आराखड्यात गाळ उपसण्याची कामे हाती घेण्यात यावी, असे सदस्य लक्ष्मण गावडे यांनी सांगितले. तर प्राधान्याने गत वर्षी जिथे टंचाई होती तिथे कामे घ्या असे राजेश जाधव त्यांनी सांगितले.
तालुक्यात 37 असाक्षरांची नोंदणी झाली असून त्यांची परीक्षा 25 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील बारा शाळांमध्ये होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पोलीस बंदोबस्तात स्मार्ट मीटर बसवा
महावितरण वरील चर्चेत स्मार्ट मीटर बसविण्याचा मुद्दा सदस्य महेश्वरी चव्हाण यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांकडून हरकत घेत घेतली जात असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर बोलताना उपसभापती सोनू सावंत यांनी गावातील काही घरांना तुम्ही स्मार्ट मीटर बसलेले आहेत तर काही घरांना हे मीटर बसविले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे त्यामुळे पोलीस बंदोबस्तात स्मार्ट मीटर बसवा. तुमची सर्विस योग्य नसल्यानेच तक्रारी वाढल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. महावितरणकडून नळ योजना व स्ट्रीटलाईटला स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे, असे महावितरण कडून सांगण्यात आले.








