LIVE UPDATES

देवगड - वेंगुर्ला परिसरात मासळी लुटणारी टोळी सक्रिय

बंदोबस्त करण्याचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 06:36 PM
views 75  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : देवगड ते वेंगुर्ला सागरी हद्दीत काही छोटे मच्छीमार चार-पाच नौकांच्या सहाय्याने संघटितपणे ट्रॉलर नौकांना घेराव घालून त्यातील मासळी लुटत असल्याची तक्रार नौका मालकांनी केली आहे. या प्रकारामुळे ट्रॉलर मच्छीमारांचे आर्थिक तसेच मासेमारीच्या जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, याप्रकरणी देवगड पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देऊन तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही जण छोट्या नौकांमधून टोळीने येऊन मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरला घेराव घालतात आणि नौकेतील मासळी बळजबरीने घेऊन जातात. नाव किंवा क्रमांक नसलेल्या या नौकांची माहिती मिळत नसल्याने संशयितांची ओळख पटवणे कठीण जात आहे. ट्रॉलर मच्छीमारांकडून तक्रारी दाखल होत नसल्याने गेल्या काही दिवसांत या प्रकारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

देवगड-वेंगुर्ला सागरी किनाऱ्यापासून आपल्या हद्दीत मासेमारी करत असताना छोट्या नौकाधारकांकडून ही लूट केली जात असल्याचा आरोप आहे. लूट करणाऱ्या १३ जणांची नावे निवेदनात देण्यात आली आहेत. तसेच लुटलेली मासळी मालवणमधील पाच खरेदीदारांकडून घेतली जात असल्याचे नमूद करून त्यांची नावेही निवेदनात देण्यात आली आहेत.

या लुटीमुळे ट्रॉलर मच्छीमारांचे आर्थिक तसेच जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकाराचा त्वरित बंदोबस्त करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सहदेव बापर्डेकर, द्विजकांत कोयंडे, निवृत्ती तारी, गोपीनाथ तांडेल, इतियास होलसेकर, अशोक सारंग, अनिस कोयंडे, प्रणव पारकर आणि रिहान शेख या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाने देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन सादर केले.