LIVE UPDATES

देवगड-जामसंडे नगरपंचायतीतर्फे खाकशी येथे वनराई बंधारा

जलपुनर्भरण व जलस्रोत संवर्धनासाठी श्रमदानातून उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 15, 2026 11:29 AM
views 41  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलपुनर्भरण आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने विविध ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. 

पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक ३ मधील वरची खाकशी येथील व्हाळावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

या उपक्रमात देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याधिकारी हरिदत्त माने, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरूल, नगरसेविका मनिषा जामसंडेकर, बाळा खडपे, राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, दया पाटील, निखिल कोयघाडी यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे, त्याचे जमिनीत पुनर्भरण होण्यास मदत करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन पाणी बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या सभापती तन्वी योगेश चांदोस्कर यांनी सर्व नळधारकांना पाण्याचा वापर करताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी गाळून व उकळूनच वापरावे, पाण्याची कोणत्याही प्रकारे नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी ही सर्वांची सामूहिक गरज असून संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचा जपून वापर करावा आणि नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.