LIVE UPDATES

Rajapur Waghotan Creek tragedy : अखेर पाच दिवसांनंतर कांदळवनात आढळला माहिराचा मृतदेह

वाघोटण खाडी दुर्घटना : खाडी दुर्घटनेतील शोधमोहीम अखेर संपली
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 12:14 PM
views 39  views
Mahira’s body found in the mangroves of Waghotan Creek in Rajapur

राजापूर : गेल्या रविवारी दुपारी वाघोटण खाडीत घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माहिरा या मुलीचा मृतदेह अखेर पाच दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास इंगळवाडी परिसरातील वाघोटण खाडीच्या कांदळवनात तिचा मृतदेह आढळून आला. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेला अखेर यश मिळाले असले, तरी या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

गेल्या रविवारी दुपारी वाघोटण खाडीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले होते; मात्र माहिराचा शोध लागत नव्हता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून तिचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. गेल्या पाच दिवसांपासून शोधमोहीम राबविण्यात येत होती.

कांदळवनातील झाडीत आढळला मृतदेह

गुरुवारी सकाळीही नेहमीप्रमाणे शोधमोहीम सुरू असताना इंगळवाडी परिसरातील वाघोटण खाडीच्या कांदळवनात साडेआठच्या सुमारास काही नागरिकांना तीव्र दुर्गंधी जाणवली. त्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता कांदळवनातील झाडीत माहिराचा मृतदेह आढळून आला.

मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली.

पाच दिवसांच्या शोधमोहिमेला पूर्णविराम

माहिराचा शोध घेण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून अथक प्रयत्न सुरू होते. खाडी परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून तिचा शोध घेतला जात होता. अखेर गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह आढळल्याने या शोधमोहिमेला पूर्णविराम मिळाला आहे.

मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करण्यात येत होती. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या दुर्दैवी दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, माहिराच्या मृतदेहाचा शोध लागल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.