
वैभववाडी : कोळपे-जमातवाडी येथे सगीरा शमशुद्दीन ताझी (वय ३०) या विवाहित महिलेने आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सगीरा ताझी या पती शमशुद्दीन गुलाल ताझी, सासू, जाऊ आणि मुलांसह कोळपे-जमातवाडी येथे राहत होत्या. आज सकाळी सासू मासळी विक्रीसाठी बाहेर गेल्या होत्या, तर जाऊ कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, पती मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेले होते.मुलांना घेऊन पती घरी परतल्यानंतर त्यांनी सगीरा यांना हाक मारली.
मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आतल्या खोलीत जाऊन पाहिले. यावेळी सगीरा या खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या. पतीने आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक फक्रुद्दीन आगा, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, पोलीस कर्मचारी हरेष जायभाय, किरण मेथे तसेच महिला पोलीस कर्मचारी कविता शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. सगीरा यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फक्रुद्दीन आगा करीत आहेत.










