
वैभववाडी : भुईबावडा परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणामुळे वैभववाडी तालुक्याची प्रतिमा मलिन झाली असून या प्रकरणातील सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केली. पंचायत समितीच्या मासिक सभेत हा विषय चर्चेत आला.
पंचायत समिती सभागृहात सुरू असलेल्या मासिक सभेदरम्यान भुईबावडा कॉपी प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सभापती रावराणे यांनी गटशिक्षणाधिकारी श्री थोरात यांच्याकडे या प्रकरणात आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती मागितली.यावर उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी श्री. थोरात यांनी माध्यमिक शिक्षण विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली.
मात्र, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांबाबत विचारणा केली असता, त्यासंदर्भात आपल्याकडे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.यावर सभापती रावराणे य माध्यमांमधील वृत्तांनुसार या प्रकरणात २४ जणांना दोषी ठरविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित सर्वांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणात संबंधित शिक्षकांवर त्यांच्या संस्थांकडून कोणती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, याचीही माहिती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. भुईबावडा कॉपी प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्याची बदनामी झाली असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मतही रावराणे यांनी सभेत व्यक्त केले.











