LIVE UPDATES

टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम करू नका

सभापती सिद्धेश रावराणे यांनी सामाजिक वनीकरण विभागाला सुनावले
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 14:27 PM
views 45  views

वैभववाडी : सामाजिक वनीकरण विभागाकडून शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली जात नसल्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही. केवळ कागदोपत्री काम करून उद्दिष्टपूर्ती दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. "टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम करू नका," असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

येथील विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात सुरू असलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सामाजिक वनीकरण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याची माहिती सादर केली. सन २०२४-२५ मध्ये आयोजित मेळाव्यास केवळ चार, तर सन २०२५-२६ मधील मेळाव्यास ११ शेतकरी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.ही माहिती ऐकताच सभापती रावराणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कोणतीही योजना राबवताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले."सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यात नेमकी कोणती कामे केली आहेत, याची माहिती द्यावी. कुर्ली परिसरात कुठे वृक्षारोपण केले आहे, तेही दाखवून द्यावे," असे आव्हान त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. केवळ अहवालांमध्ये कामे दाखवून चालणार नाही, तर ती प्रत्यक्षात दिसली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापुढे विभागाने कोणतीही योजना राबवताना लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना द्यावी. जर लोकप्रतिनिधींना माहिती देण्याची तयारी नसेल, तर अशा योजना राबवू नयेत, असे स्पष्ट आदेश सभापती रावराणे यांनी बैठकीत दिले.