
कुडाळ : ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनामुळे सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव आमदार सतेज (बंटी) पाटील आणि संजय पाटील यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी, "डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, समाजकारण आणि राजकारणात केलेले कार्य अत्यंत मोठे असून, त्यांच्या निधनामुळे या सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उद्योजक प्रशांत पोकळे, स्वरूप कदम, संतोष गाडगीळ, विनय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.











