
सावंतवाडी : आंबोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर चार दिवसीय अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यातील छोटे पत्रकार हा उपक्रम कौतुकास्पद व लक्षवेधी ठरला.
या चार दिवसांच्या उपक्रमामध्ये दररोज वेगवेगळ्या विषयांवर आधारित उपक्रम राबविण्यात आले. पहिल्या दिवशी ‘निसर्ग शाळा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले , वनस्पती व फुलपाखरू अभ्यासक राकेश देऊळकर , निसर्ग अभ्यासक रोहन कोरगावकर तसेच निसर्ग अभ्यासक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काका भिसे यांनी विद्यार्थ्यांना जंगलामध्ये घेऊन जात पशुपक्षी, कीटक, वनस्पती, साप व बेडूक यांविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘छोटे पत्रकार’ हा उपक्रम राबविण्यात आला. या छोट्या पत्रकारांनी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा तसेच अंबोली पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विविध प्रश्न विचारून प्रशासन आणि पोलिसांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. तिसऱ्या दिवशी हेमंत ओगले यांनी फुलपाखरांवर प्रेझेंटेशन व स्लाइड शो सादर करून फुलपाखरांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये आणि निसर्गातील भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध आगळेवेगळे आणि नाविन्यपूर्ण खेळ आयोजित करण्यात आले. हे खेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी उपयुक्त ठरले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण व्हावी, सामाजिक बांधिलकी वाढावी, आरोग्य चांगले राहावे तसेच आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साबळे, शिक्षक श्री. शिंदे तसेच केंद्रप्रमुख आर बी गावडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन ते सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करतील, अशी अपेक्षा पालक व शिक्षकांनी व्यक्त केली आहे.











