LIVE UPDATES

संजय राऊतांचं 'ऑपरेशन लफंगा' करून टाका

शिवसेनेचे वाटोळे सुपारी घेऊन केलं
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 16:59 PM
views 226  views

आमदार निलेश राणे यांचा हल्लाबोल 

कुडाळ : "मागील दहा वर्षांत या मतदारसंघात काहीच विकासकामे झाली नाहीत. मंत्रालयापर्यंत जो आवश्यक मेसेज पोहोचायला हवा होता, तो नेण्यात पूर्वीचे आमदार पूर्णपणे अपयशी ठरले," अशी घणाघाती टीका आमदार निलेश राणे यांनी केली. कुडाळ येथील मच्छिंद्रनाथ नाट्यगृहाच्या शुभारंभावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मतदारसंघाच्या विकासाचा अजेंडा स्पष्ट केला.

आमदार राणे म्हणाले की, "निवडणुकीपूर्वी मी येथील रोजगार, पायाभूत सुविधा आणि पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. हे सर्व विषय मी विधिमंडळात प्रभावीपणे मांडत आहे. वन संज्ञा, महामार्ग, आकारी पड जमीन, अंमली पदार्थ (ड्रग्ज) आणि बनावट दारू यांसारख्या गंभीर प्रश्नांवर मी सभागृहात आवाज उठवला. माझ्या कार्यकाळात सभागृहात मांडलेल्या विषयांपैकी ९०% विषय हे नेहमी या मतदारसंघाच्या विकासाचेच राहिले आहेत. 

महायुती सरकारकडून विकासासाठी भरघोस मदत मिळत असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, "जेव्हा जेव्हा मी विकासकामांसाठी निधीची मागणी केली, तेव्हा तेव्हा महायुती सरकारने मला कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे."

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी 'जे फुटतील त्यांच्या प्रभागात राडे करा' असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार घेताना निलेश राणे म्हणाले, "आता संजय राऊत यांच्या पक्षात राडे करणारे कोणीच शिल्लक राहिलेले नाही. आम्हीच राडे करायचो, पण आता तिथे माणूसच नाही. उलट, अशीच परिस्थिती राहिली तर संजय राऊतच कधीतरी फटके खातील."

संजय राऊत यांच्यावर थेट हल्ला चढवत आमदार राणे म्हणाले: "त्या पक्षाचे सर्वात जास्त नुकसान हे संजय राऊत यांनीच केले आहे. शिवसेनेचे वाटोळे त्यांनी सुपारी घेऊन केले आहे. त्यामुळे जर सुरुवात करायची असेल, तर पहिली फटकेबाजी संजय राऊतांपासूनच झाली पाहिजे, कारण पहिले फटके हे योग्य माणसालाच पडले पाहिजेत. भाईगिरीची भाषा संजय राऊत यांच्या तोंडून अजिबात शोभत नाही."

"महाराष्ट्र सध्या विकासाच्या दृष्टीने वेगाने पुढे जात आहे. जे नेते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, त्यांच्याकडे लोक तरी कसे राहतील?" असा सवाल करत आमदार राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. "उलटपक्षी, एकनाथ शिंदे हे जनतेला आणि कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ देतात. 'शिंदे साहेबांकडून कामे होतात' असा विश्वास आज लोकांना आहे," असे ते म्हणाले.

 उद्या आमदारही जातील

उबाठाच्या बैठकांवर टीका करताना ते म्हणाले की, या बैठकांना जाऊन काहीच साध्य होत नाही हे आता कार्यकर्त्यांनाही कळून चुकले आहे. "आज खासदार गेले आहेत, उद्या आमदारसुद्धा जातील. जर कामेच होत नसतील, तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षात का थांबतील? विकासकामांसाठी नेत्यांचा खंबीर आधार लागतो, जर तोच मिळत नसेल तर कार्यकर्त्यांनी कुठे जावे? आज आमची फक्त नजर गेली, तरी उबाठाचे लोक आमच्या पक्षात यायला तयार आहेत."

बाळासाहेबांचे खरे विचार आमचीच शिवसेना जोपासते

शिवसेनेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आमदार राणे म्हणाले, "शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या जीवाभावाची संघटना आहे. अकोल्यात काही झाले, तर दोडामार्गातून लोक धावून जातील, अशी ही संघटना होती. पण आज बाळासाहेबांचे खरे विचार ही आमचीच शिवसेना (महायुती) जोपासत आहे."

संजय राऊत यांच्या 'ऑपरेशन टायगर' या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार राणे यांनी शेवटी टोला लगावला की, "ऑपरेशन टायगर वर लक्ष ठेवण्या आधी तुमच्या पक्षात एक 'ऑपरेशन लफंगा' करून टाका. संजय राऊत यांच्यामुळेच तुमच्या पक्षाचे अतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे पहिले त्यांचेच ऑपरेशन करणे गरजेचे आहे."असा टोला देखील त्यांनी लगावला.