
महावितरण अधीक्षक अभियंतांची माहिती
सिंधुदुर्ग : स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज चुकीचे असून भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि महावितरणच्या आधुनिकीकरण धोरणांतर्गत सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची मोहिम सुरू केली आहे. अचुक बिलींग, मानवी हस्तक्षेपाशिवाय रिडींगसह वीज वापरावर नियंत्रण तसेच मोबाइलद्वारे वापर आदी फायदे यात असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली. ग्राहकांना न विचारता परस्पर बसविण्यात येणारे मीटर, स्मार्ट मीटरची येणारी अव्वाची सव्वा बीलांबाबत विचारल असता ते बोलत होते.
अधीक्षक अभियंता म्हणाले, मोबाईल ॲपनुसार वीज वापरावर नियंत्रण देखील आणता येते. स्मार्ट मीटरमध्ये सकाळी ९ ते ५ या काळातील नोंद होऊन प्रत्येक यूनिट मागे घरगुती ग्राहकांना ८५ पैशांची सूट आहे. तर ग्राहकांना लेखी पत्राद्वारे कल्पना देऊनच आम्ही मीटर बदलत आहोत. तसेच तोंडी कल्पना दिल्याशिवाय आम्ही मीटर बदलत नाही. ग्राहकाने प्रकर्षाने विरोध केल्यास त्यांना स्मार्ट मीटरचे फायदे देखील समजून सांगत आहोत. तसेच स्मार्ट मीटर वीज वापरामुळे जास्त बील येत असा प्रकार नाही. जुना मीटर आणि स्मार्ट मीटर सारखं रीडींग देतो. याची खात्री करण्यासाठी आम्ही दोन्ही मीटर ग्राहकांना बसवून दाखवले आहेत. तसेच जर बीलात चूक असेल तफावत असेल तर ती दुरुस्ती करून दिली जाईल अशी माहीती श्री. राख यांनी दिली. तर ग्रामीण भागात ४८ तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडीत राहिल्यास व शहरी भागात २४ तासांपेक्षा खंडीत राहिल्यास ग्राहकांना मोबदला मिळू शकतो. त्यासाठी ऑनलाईन तक्रार करण आवश्यक आहे. पावसात वीजांचा गडगडाट होताना आम्ही काहीकाळ पुरवठा बंद ठेवतो. कारण, वीज, वारा, पाऊस बघता जीवितहानी टाळण्यासाठी पुरवठा खंडित केला जातो. ऑनलाईन तक्रार करणाऱ्या ग्राहकांना मोबदला मिळालेला आहे अशी माहिती त्यांनी दिली.










