
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे मंदिराच्या पाठीमागील सागरी महामार्गालगतचा संरक्षक कठडा धोकादायक स्थितीत पोहोचला असून तो अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची चिंता वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही संबंधित यंत्रणेकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
तारामुंबरी–मिठमुंबरी सागरी महामार्गावरील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर देवगड ते मालवण दरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गावरून सुरू झाली आहे. याशिवाय कुणकेश्वर हे राज्यातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ येथे पाहायला मिळते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
कुणकेश्वर मंदिराच्या पाठीमागील भागातून जाणारा रस्ता तुलनेने अरुंद असून येथे एक तीव्र वळण आहे. या वळणावरून जाताना वाहनांचा वेग नियंत्रणात न राहिल्याने अनेक वाहनांची धडक समोरील संरक्षक कठड्याला बसत असल्याचे वारंवार घडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून प्रत्येक अपघातानंतर कठड्याची तात्पुरती दुरुस्ती करून प्रश्नावर पडदा टाकला जात असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
यापूर्वी दोन वेळा वाहनांच्या जोरदार धडकेत संरक्षक कठडा पूर्णपणे तुटून वाहने थेट समुद्राच्या दिशेने कलंडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा पावसाळ्यात या ठिकाणी धोका अधिक वाढत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वरमध्ये दररोज शेकडो भाविक व पर्यटक येत असतात. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. केवळ तुटलेला भाग दुरुस्त करण्यापेक्षा मजबूत आणि टिकाऊ संरक्षक भिंत किंवा कठडा उभारून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक तसेच भाविकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.










