
सावंतवाडी : भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग करणे आवश्यक असून यासाठी अधिकाधिक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
पालकमंत्री यांच्या आवाहनानुसार सावंतवाडी तालुक्यातील डेगवे ग्रामपंचायत येथे वनराई बंधारे उभारण्याच्या कामास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीमध्ये ‘जलतारा’ उपक्रमांतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे तसेच शेती व स्थानिक पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध जलसाठा वाढविण्याच्या दृष्टीने वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच संबंधित विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘आज पाणी अडविले तर उद्याची पाणीटंचाई टाळता येईल’ या उद्देशाने नागरिकांनीही जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांतील भातपिकावर परिणाम झाला असून, पाण्याअभावी भातशेती करपल्याचे चित्र आहे.
डेगवे ग्रामपंचायत हद्दीतील करपलेल्या भातशेतीची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.या कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आवश्यक त्या उपाययोजनांसाठी प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांना आश्वासित केले.











