LIVE UPDATES

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबत शाळा, गाव अन् जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे

बबन राणे यांचे प्रतिपादन : इन्सुली पागावाडी शाळा नं. ५ ला दोन संगणक व एक प्रिंटर भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 18:29 PM
views 48  views

सावंतवाडी : ज्ञान हे धनदौलत असून मुलांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी सतत शिकत राहिले पाहिजे. उज्ज्वल भविष्यासाठी संगणक ज्ञान अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबत शाळा, गाव आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी केले.

आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली पागावाडी शाळा नं. ५ ला दोन संगणक व एक प्रिंटर देण्यात आला. या संगणकांचा लोकार्पण सोहळा पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यश संपादन केलेल्या कु. दीपश्री दीपेश सावंत हिच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला माजी उपसरपंच कृष्णा सावंत, केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, पत्रकार प्रा. रुपेश पाटील, आप्पा आमडोसकर, दत्ताराम पेडणेकर, बापू कोठावळे, प्रकाश सावंत, शिक्षक हंसराज गवळे, भैरू पाटील, पत्रकार आनंद धोंड, मिलिंद धुरी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य योजना मुळीक, ऊर्मिला पडवळ, लक्ष्मी सावंत, वैष्णवी सावंत, संध्या पाटील यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बबन राणे म्हणाले, आमदार दीपक केसरकर हे जनकल्याणासाठी सतत कार्यरत राहून काम करत आहेत तसेच दूरदृष्टी असलेले नेतृत्व असल्याने त्यांनी संगणक प्राथमिक शाळेत देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती मध्ये संगणकाचे महत्त्व जाणून घेण्याची संधी दिली आहे त्या संधीचा फायदा घेऊन मुलांनी नावलौकिक मिळवला पाहिजे.

याप्रसंगी बोलताना पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी, डिजिटल युगात शैक्षणिक प्रगतीसाठी संगणक ज्ञानाची आवश्यकता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी या भौतिक सुविधांचा पूर्ण फायदा घ्यावा असे आवाहन केले. माजी उपसरपंच कृष्णा सावंत, केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, मुख्याध्यापक भास्कर माजगावकर आणि शिक्षक सुधीर गावडे यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत आणि प्रगतीबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच पत्रकार प्रा. रूपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा दिली.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपेश सावंत यांनी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण दर्जेदार असल्याचे सांगत माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी पत्रकार प्रा. रूपेश पाटील यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाढदिनी खाऊ भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक सुधीर गावडे यांनी मानले.