
दोडामार्ग : हत्ती बंदोबस्थासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्मल ड्रोनने हत्तीचे लोकेशन बघण्यापलीकडे इतर जंगली प्राणी बघून मोठ्या प्रमाणात शिकार केली जात असल्याचा गंभीर आरोप मानद वन्यजीव रक्षक (महाराष्ट्र वनविभाग) संजय जयराम सावंत यांनी केला आहे. तिलारी खोऱ्यात होणाऱ्या शिकारीवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचाकडे निवेदन दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या तिलारी खोऱ्यातील वन्यजीव संपदेचे रक्षण करण्यासाठी, वाघांचा नैसर्गिक अधिवास टिकवून ठेवण्यासाठी आणि अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) तथा वनश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय जयराम सावंत यांच्यासोबत मानद वन्यजीव रक्षक (सिंधुदुर्ग) भाग्यश्री परब, 'WWA' चे समन्वयक मंदार गावडे आणि वन्यजीव अभ्यासक अभिजित सिनारी हे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षकांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
रात्रीच्या वेळी 'थर्मल ड्रोन' वापराची सखोल चौकशी व कारवाई
तिलारी खोरे आणि संवेदनशील वनक्षेत्रात रात्रीच्या वेळी 'थर्मल ड्रोन'चा (Thermal Drone) वापर वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्या अंधारात थर्मल ड्रोन उडवण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हा प्रकार वन्यजीव सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संशयास्पद व धोकादायक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ड्रोन उडवणाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अवैध शिकार व तस्करीला आळा
तिलारी खोऱ्यातील वाघ, बिबटे आणि इतर दुर्मिळ व शेड्यूल-१ मधील वन्यजीवांच्या अधिवासात अवैध शिकारीचे प्रकार रोखण्यासाठी वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त गस्त व कडक कारवाई करावी.
खाजगी ड्रोनद्वारे होणाऱ्या अनधिकृत चित्रीकरणावर बंदी
हत्ती बाधित क्षेत्र आणि संवेदनशील वनक्षेत्रात हौशी पर्यटक व सोशल मीडिया युजर्स खाजगी ड्रोनद्वारे बेसुमार चित्रीकरण करत आहेत. यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक दिनचर्येत अडथळा निर्माण होऊन ते मानवी वस्त्यांकडे वळण्याचा धोका वाढला आहे.
शिकाऱ्यांना मिळणारी गोपनीय माहिती रोखणे
ड्रोन चित्रीकरणाद्वारे जंगलातील पाणवठे आणि वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गांचे अचूक लोकेशन (GPS Coordinates) सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याने ही गोपनीय माहिती शिकाऱ्यांच्या हाती लागून वन्यजीवांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे.
कठोर कायदेशीर कारवाई व ग्रामस्थांची गोपनीयता
विनापरवाना दिवसा किंवा रात्री ड्रोन उडवणाऱ्यांवर 'वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२' आणि 'भारतीय न्याय संहिते' अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी, तसेच जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांची, विशेषतः महिलांची वैयक्तिक गोपनीयता (Right to Privacy) जपली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वनविभाग व पोलीस प्रशासनाचा संयुक्त पुढाकार
या सर्व गंभीर बाबींची पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी गांभीर्याने दखल घेतली असून रात्रीच्या थर्मल ड्रोन वापराची चौकशी करून कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच, वन्यजीव संरक्षण आणि अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, यासंदर्भात उपवनसंरक्षक (DCF), सावंतवाडी वनविभाग यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली आहे. वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून दोषी व संबंधितांवर निश्चितच कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








