
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता कमी होऊन वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मानव–वन्यप्राणी संघर्षाच्या घटना रोखणे तसेच वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सावंतवाडी वन विभागामार्फत जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
या कृती दलाच्या अध्यक्षपदी उपवनसंरक्षक, सावंतवाडी वन विभाग यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहाय्यक वनसंरक्षक, उपविभाग क्रमांक १ व २ हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच सहाय्यक वनसंरक्षक, उपविभाग क्रमांक १ व २ यांच्यासह सावंतवाडी, दोडामार्ग, आंबोली, कुडाळ, कणकवली व कडावल या सहा वनपरिक्षेत्रांतील वनपरिक्षेत्र अधिकारी या कृती दलाचे सदस्य असतील. या कृती दलामार्फत जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
वन्यप्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचे साठे निर्माण करणे, तसेच आवश्यक ठिकाणी पाणी साठवण व पुनर्भरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी वनक्षेत्रातील वणव्यांच्या घटना रोखणे व त्यांचे प्रभावी नियंत्रण करणे, वनाग्नीमुळे वन्यजीवांचे अधिवास आणि नैसर्गिक खाद्यस्रोतांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, संवेदनशील क्षेत्रांमध्ये नियमित गस्त घालणे आणि आग लागल्यास तातडीने नियंत्रणाची कार्यवाही करणे यावरही कृती दल विशेष लक्ष देणार आहे.
वनक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांची उपलब्धता कायम राहावी, यासाठी आवश्यक संवर्धनात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने कृती दलाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक वनराई बंधाऱ्यांची (लघु वनबंधारे) निर्मिती करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमुळे वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, वन्यप्राण्यांना स्थानिक स्तरावर पाणी उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.
मानव–वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी कृती दलामार्फत जलद प्रतिसाद पथकांची तत्काळ तैनाती सुनिश्चित करण्यात येणार आहे. संघर्षाची घटना घडल्यास संबंधित पथकाने घटनास्थळी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणणे, आवश्यकतेनुसार वन्यप्राण्यांची सुरक्षित सुटका व बचावकार्य करणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय, वनपरिक्षेत्रनिहाय वनक्षेत्रातील पाण्याच्या उपलब्धतेचा नियमित आढावा घेतला जाणार असून, पाणी उपलब्धतेसाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचे निरीक्षण केले जाणार आहे.
मानव–वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांवर लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. वन्यप्राण्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संरक्षण, वनक्षेत्रातील नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांची उपलब्धता सुनिश्चित करणे, मानव–वन्यप्राणी संघर्षाच्या घटना कमी करणे आणि नागरिकांसह वन्यजीवांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हा या जिल्हास्तरीय कृती दलाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास किंवा मानव–वन्यप्राणी संघर्षाची घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने वन विभागास माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वन विभागामार्फत करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








