
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ शुक्रवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघे जण जखमी झाले. हा अपघात रात्री सुमारे ८.५५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक GJ 21 BR 4869 मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असताना समोरून चुकीच्या बाजूने (रॉंग साईडने) येणाऱ्या MH 08 BA 9373 क्रमांकाच्या दुचाकीशी तिची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही दुचाकींवरील प्रवासी रस्त्यावर कोसळून जखमी झाले.
याचदरम्यान ड्युटीवर जात असलेले होमगार्ड जवान नवनाथ घोलप यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी थांबून जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांनी मदतीची व्यवस्था केली.
दरम्यान, भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणिज धाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अपघातातील तिन्ही जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले.
या अपघातात लक्ष्मण राम धोत्रे (वय ३२, मूळ गाव लातूर, सध्या रा. कळंबणी), चंद्रकांत दत्ताराम आग्रे (वय ३१, रा. वीर बंदर, चिपळूण) आणि किरण कृष्णा कलके (वय २९, रा. वीर बंदर, चिपळूण) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्तांना वेळीच रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तातडीने सेवा बजावली. अपघाताच्या ठिकाणी वेळेत मदत पोहोचल्याने जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळू शकले.
मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहतुकीची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत चुकीच्या दिशेने वाहन चालवणे अत्यंत धोकादायक ठरत असून, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अपघाताबाबत पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.










