
वेंगुर्ला : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नगरपरिषदेने गणेशोत्सवापासून बॅनरमुक्त शहर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात येणारे बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिरातींना पर्याय म्हणून शहरातील पाच प्रमुख ठिकाणी एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि नागरिकांची संयुक्त बैठक २० ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरातील स्वच्छता, वाहतूक व पार्किंग व्यवस्थेसह सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारे अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज व जाहिराती याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर वेंगुर्ला शहर बॅनरमुक्त करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लावण्यात येणारे होर्डिंग्ज, बॅनर्स व जाहिराती हटविण्याबाबत जनहित याचिका पीआयएल क्र. 155/2011 अनुषंगाने न्यायालयाने नगरपरिषद, पोलीस व राज्य शासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करतानाच नागरिकांना शुभेच्छा, व्यावसायिक जाहिराती आणि विविध माहिती प्रसारित करण्यासाठी पर्यायी माध्यम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
'या' पाच ठिकाणी झळकणार डिजिटल जाहिराती
दाभोलीनाका, पिराचा दर्गा, बाजारपेठ, हॉस्पिटल नाका, कॅम्प अग्निशमन केंद्र या स्क्रीनच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, व्यावसायिक जाहिराती, नगरपरिषदेचे स्वच्छता व जनजागृतीपर संदेश तसेच सार्वजनिक हिताची विविध माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविता येणार आहे.
जाहिरातींसाठी दरही निश्चित
२५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एलईडी स्क्रीनवर जाहिराती प्रसारित करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. एक आठवड्यासाठी २ हजार, पंधरा दिवस ३ हजार, एक महिना ५ हजार जाहिरात सर्व एलईडी स्क्रीनवर किमान २० सेकंद प्रदर्शित करण्यात येणार आहे.
एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना बॅनर व होर्डिंग्जला आधुनिक आणि प्रभावी पर्याय उपलब्ध होणार असून, त्यामुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण टाळण्यास मदत होणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या स्वच्छता, जनजागृती व विविध सार्वजनिक उपक्रमांचा डिजिटल माध्यमातून अधिक प्रभावी प्रचार-प्रसार करता येणार आहे. त्याचबरोबर डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास हातभार लागणार आहे.
वेंगुर्ला शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर, फलक व होर्डिंग्ज न लावता एलईडी स्क्रीनच्या डिजिटल माध्यमाचा वापर करावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अभिजीत गिरप ९४२०२५८७६४, मंदार चौकेकर ७०५८४८६५५९ यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.










