LIVE UPDATES

konkan Ganesh Chaturthi 2026 : बाप्पाच्या ओढीने कोकण गजबजलं!

गणेश चतुर्थी अवघ्या तीन दिवसांवर; बाजारपेठा सजल्या, चाकरमानी गावी परतू लागले, घराघरांत स्वच्छता-रंगरंगोटीला वेग
Edited by: लक्ष्‍मण आडाव
Published on: September 12, 2026 14:11 PM
views 72  views
The work of painting Ganesha idols

सिंधुदुर्ग : गणेशोत्सव म्हटलं की कोकणवासीयांच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. वर्षभराची प्रतीक्षा संपवत लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी कोकणातील घराघरांत लगबग सुरू झाली आहे. गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा विविध गणेशोत्सव साहित्याने सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची वर्दळही वाढू लागली आहे.

मुंबई, पुण्यासह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी आता आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला लागले असून, ‘गणपतीला गावी जायचं’ या ओढीने कोकणात पुन्हा चैतन्य फुलू लागले आहे.

कोकणातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो मातीशी, माणसांशी आणि आपल्या गावाशी नाळ जोडणारा महाउत्सव आहे. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार असून, त्यानिमित्त घराघरांत गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू झाली आहे.

घरांची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, आरास तसेच पूजाविधीसाठी लागणाऱ्या विविध साहित्याची खरेदी याला वेग आला आहे. वर्षभर बंद असलेली घरेही बाप्पांच्या आगमनासाठी उघडली जात असून, घरादारांना नव्या उत्साहाची आणि चैतन्याची झळाळी प्राप्त होत आहे.

मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांत स्थायिक झालेले लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी दाखल होत आहेत. त्यामुळे गावागावांत पुन्हा एकदा नातेवाईकांच्या भेटीगाठी, घराघरातील गजबज आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वपरंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मेळ घालत साजरा होणारा कोकणचा हा गणेशोत्सव यंदाही भव्य आणि उत्साहपूर्ण होणार असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

अवघ्या चार दिवसांवर बाप्पांचे आगमन येऊन ठेपल्याने वाद्य कारागीर आणि मूर्तिकारांचे युध्दपातळीवर काम सुरु झाले आहे. गणेश मूर्ती रंगविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्‍यासाठी हजारो हात रात्रंदिवस राबत आहेत. त्‍याचबरोबर आरती भजनासाठी लागणाऱ्या तबला, मृदंग दुरूस्‍ती कारागिरांचे कामही रात्रंदिवस सुरू आहे.

कोकणातील प्रत्‍येक घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव आणि लाखोंच्या संख्येने येणारे चाकरमानी या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा, जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वाहतूक व्यवस्‍थेचे नियोजन, पार्किंग व्‍यवस्था याबाबतची सज्जता त्‍या त्‍या ठिकाणच्या स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांनी केली आहे.