
कणकवली : माजी आमदार वैभव नाईक यांचे बंधू सतीश नाईक यांच्याकडे वर्षभरापासून कामगार म्हणून काम केल्यानंतर त्यांच्याच घरातील तब्बल साडेतीन तोळ्यांचे दागिने व एक लाखाचे प्लायवूड मिळून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरणारा चोरटा लिलाधर मोडाराम सुथार (39 वर्षे,मूळ रा- पिंपासार नागोर,राज्य राजस्थान) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने एलसीबी मुंबई परिसरात सापळा रचून अटक केली. सद्यस्थितीत त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही चोरीची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. चोरट्याने सतीश नाईक यांच्या पत्नीचे 3.7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (त्यात सोन्याच्या बांगड्या,अंगठी वैगेरे) व र1 लाख किमतीचे लाकडी प्लायवूड असा मुद्देमाल चोरी केला होता. त्यानंतर तो गोवा,राजस्थान, जयपूर, उदयपूर अशा वेगवेगळ्या राज्यात सुमारे 3 वर्षापासून स्वत:चे अस्तित्व लपवून फिरत होता.
आरोपी ताडदेव - मुंबई परिसरात असल्याबाबत तांत्रिक व गोपनीय माहितीवरून निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पथक यांनी मुंबई गाठून आराध्या आवान बिल्डिंगजवळ,भाटिया हॉस्पिटलच्या मागे ताडदेव - मुंबई येथे सापळा लावून शिताफीने अटक केली.
कारवाईत पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार जॅकसन घोणसाल 20 , कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार पांडुरंग पांढरे आधी सहभागी झाले होते.










