
देवगड : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसातील कमतरता आणि अन्य निकषांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत दुष्काळाची ‘ट्रिगर-१’ अर्थात ‘प्रथम कळ’ लागू करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सध्या उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. आगामी काळात ही परिस्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यात पशुधनासाठी हिरवा व सुका चारा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुपालकांनी आतापासूनच चारा संवर्धनाचे नियोजन करावे, असे आवाहन तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास अधिकारी तथा तालुका पशुचिकित्सालय, देवगड यांच्या वतीने करण्यात आले.
सध्या देवगड तालुक्यातील अनेक भागांमध्ये रानामध्ये तसेच रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रकारचे नैसर्गिक गवत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवर ‘करपील’ म्हणून ओळखले जाणारे गवत तसेच इतर प्रकारचे गवत अनेक ठिकाणी मुबलक प्रमाणात दिसून येत आहे. हे गवत योग्य अवस्थेत कापून स्वच्छ जागेत व्यवस्थित वाळवून त्याचे Hay Making (हे मेकिंग) म्हणजेच स्थानिक भाषेतील ‘पयान’ तयार करून सुरक्षित साठवणूक केल्यास आगामी चारा टंचाईच्या काळात त्याचा उपयोग पशुधनासाठी करता येऊ शकतो.
गवत कापल्यानंतर ते जमिनीवरील ओलावा, पाऊस आणि दूषित पदार्थांपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. गवत पूर्णपणे वाळल्यानंतरच त्याची साठवणूक करावी. ओलसर गवत साठवल्यास बुरशी निर्माण होऊन चाऱ्याची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाळलेले गवत कोरड्या, हवेशीर आणि पावसापासून संरक्षित ठिकाणी साठवावे. तसेच अपरिचित किंवा संभाव्य विषारी वनस्पती गवतामध्ये मिसळणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी.
चारा टंचाई निर्माण झाल्यानंतर चारा शोधण्यापेक्षा आज उपलब्ध असलेला चारा वाचवणे अधिक शहाणपणाचे आहे,’ या उद्देशाने पशुपालक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी उपलब्ध गवत वाया जाऊ न देता शक्य त्या प्रमाणात ‘पयान’ तयार करून घरगुती चारा बँक उभारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात आयोजित कार्यशाळेला मिठबाव मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोक, पंचायत समिती सदस्य सदाभाऊ ओगले, पंचायत समिती देवगड पशुसंवर्धन विभागाचे सचिन घाडी, मिठबाव पशुचिकित्सालयाचे अभय करंबेळकर, पोयरे पशुचिकित्सालयाचे जगदीश फाटक, नारिंग्रे पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे वैभव शारबिद्रे आणि मोंड पशुचिकित्सालयाचे विकास कदम उपस्थित होते. कार्यशाळेला मोठ्या संख्येने पशुपालक व शेतकरी उपस्थित होते.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन हिंदळे शाळेच्या केंद्रप्रमुख जान्हवी आनंद लोक यांनी केले. या कार्यक्रमासाठी रामेश्वर विद्यालयाने सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विद्यालयाचे आभार मानण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. परिणामी उन्हाळ्याच्या उत्तरार्धात काही भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर चारा बँक उभारणे पशुधनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. आज उपलब्ध असलेला चारा योग्य पद्धतीने जतन केल्यास भविष्यातील चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना त्याचा आधार मिळू शकतो.










