
वेंगुर्ले :
वेंगुर्ले तालुक्यातील आडारी-टेंबवाडी येथील रहिवासी मनिषा गुंडराज शिरोडकर (वय ६४) यांच्या बंद असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे ३१ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले असून घरातील सामानाची तोडफोड करून साहित्य अस्ताव्यस्त टाकले. याप्रकरणी शिरोडकर यांच्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषा शिरोडकर या कुटुंबासमवेत मुंबईला राहतात. शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्या पती गुंडराज व नातू पृथ्वीराज यांच्यासह वेंगुर्ला आडारी येथे आपल्या घरी आल्या असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कापून बाजूला फेकल्याचे दिसून आले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता वॉशिंग मशीन, कुलर फोडलेला तसेच घरातील सोफासेट खोलून त्यातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे आढळले. घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वेंगुर्ले पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची माहिती पोलिसांना दिली. शिरोडकर या दि. ४ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत वेंगुर्ले येथे आल्या होत्या. दि. १७ जुलै रोजी सायंकाळी त्या घराला कुलूप लावून मुंबई ला गेल्या.
चोरी झाली असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलिस योगेश राऊळ, जयेश सरमळकर, स्नेहा गवस, पालकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा मुहूर्तमणी, तीन सोन्याची चैन, सोन्याच्या आठ बांगड्या, सोन्याची दोन अंगठी, सोन्याचे ब्रेसलेट, चांदीचा एक मध्यम आकाराचा मोदक, दोन पितळी समया असे सुमारे ३१.५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
विभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांची घटनास्थळी भेट
विभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच चोरीच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ठसे तज्ञ आणि डॉग स्कॉड कडून तपासणी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच निलेश चमणकर, सदस्य राधा पेडणेकर, पोलीस पाटील विजय नार्वेकर यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान वेंगुर्ले पोलिसांनी घटनास्थळी सर्वतोपरी तपासणी करून सविस्तर तक्रार घेऊन अज्ञात चोरट्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.










