LIVE UPDATES

हिरांच्या झाडूची पारंपरिक कला लोप पावण्याच्या मार्गावर

मागणी कायम; मात्र वळेकऱ्यांची संख्या घटल्याने पारंपरिक व्यवसायावर संकट
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 16:05 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : माडांच्या झापापासून हिरांचे झाडू तयार करण्याची देवगड तालुक्यातील पारंपरिक कला आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे. वयोमानामुळे अनेक अनुभवी वळेकऱ्यांनी हा व्यवसाय सोडला असून, नवीन पिढीनेही या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवल्याने तालुक्यात हिरांचे झाडू दुर्मिळ होत आहेत. बाजारपेठेत या झाडूंना आजही मागणी असली तरी ते तयार करणाऱ्या कारागिरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

देवगड तालुक्यात नारळाचे उत्पादनक्षम क्षेत्रफळ मोठे आहे. बागायतदारांकडून वाडीत तसेच शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात माडांची लागवड केली जाते. त्यामुळे नारळाच्या झापांचीही मोठ्या प्रमाणात उपलब्धता होते. माडावरून नारळ पाडताना सुके अथवा ओले झापही काढले जातात. तालुक्यातील काही कुटुंबांकडून हे झाप खरेदी करून त्यापासून हिरांचे झाडू तयार केले जातात.

झापापासून झाडू तयार करण्याची प्रक्रियाही कौशल्यपूर्ण आहे. कोयती किंवा खराळीच्या साहाय्याने झापापासून पात्या वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर पात्यांना दोन ते तीन दिवस ऊन दिले जाते. विळी किंवा सुरीच्या साहाय्याने पात्यांपासून हिर वेगळे केले जातात. हे हिर मुठीत घेऊन पाटावर ठोकून त्यांची बांधणी केली जाते. झाडूची वरील बाजू सुंभाने घट्ट बांधल्यानंतर साधारण तीन ते साडेतीन फुटांचा झाडू तयार होतो.

सुक्या हिराच्या झाडूला साधारण १५० ते १६० रुपये, तर ओल्या हिराच्या झाडूला १८० ते २०० रुपये दर मिळतो. काही ठिकाणी या पारंपरिक झाडूला ‘मुगड्याची झाडू’ किंवा ‘वाडवण’ असेही संबोधले जाते. बाजारपेठेत अशा झाडूंना सुमारे २०० ते २५० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे कारागिरांकडून सांगण्यात येते.

असे होतात व्यवहार

बागायतदारांकडून वळेकरी तयार झाप साधारण १० ते १५ रुपये दराने खरेदी करतात. काही वेळा बागायतदार स्वतःच्या वापरासाठी झाडू तयार करून घेण्यास सांगतात. अशावेळी एका झाडूची बांधणावळ सुमारे १५० रुपये घेतली जाते. झाडू तयार केल्यानंतर उरलेल्या हिराच्या पात्या वळेकरी इंधनासाठी वापरतात.

पूर्वी अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून होता. मात्र सध्या तालुक्यात अनुभवी वळेकरी मोजकेच उरले आहेत. स्थानिक पातळीवर झाडू तयार करणारे कारागीर कमी झाल्याने इतर गावांतून हिरांचे झाडू बाजारात येत आहेत. स्थानिक मागणी कमी झाल्याने काही बागायतदार झाप आणि पात्यांचा जळणासाठी वापर करू लागले आहेत.

माडाच्या झापापासून हिरांचे झाडू तयार करण्याचे कौशल्य हे केवळ पारंपरिक व्यवसायाचे साधन नसून कोकणच्या ग्रामीण जीवनशैलीचा एक भाग आहे. बाजारपेठेत मागणी आणि योग्य दर मिळत असतानाही कारागिरांची संख्या कमी होत असल्याने ही कला जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. नवीन पिढीला या कलेचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास या पारंपरिक व्यवसायाला पुन्हा चालना मिळू शकते, असे मत वळेकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.