
देवगड : स्वप्नील लोके
समुद्र खवळलेला... वादळी वारे सुटलेले... मुसळधार पावसामुळे गलबत देवगड बंदरापर्यंत पोहोचत नव्हते आणि घरात गणेशोत्सवाची लगबग सुरू होती. गणरायाच्या आगमनाची वाट पाहत असलेल्या गोळवणकर (सावंत) कुटुंबीयांसमोर त्या दिवशी मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर गणेशोत्सवाचा मुहूर्त चुकू नये म्हणून देवगड येथील गणेश चित्रशाळेतून श्रींची दुसरी मूर्ती आणून तिची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
मात्र काही वेळातच मुंबईहून मूर्ती घेऊन निघालेले गलबत वादळाला तोंड देत देवगड बंदरात दाखल झाले आणि गणरायाची मूर्ती घेऊन कुटुंबीय घरी पोहोचले. घरात आधीच गणपतीची प्रतिष्ठापना झालेली पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ‘आता या दुसऱ्या मूर्तीचे काय करायचे?’ हा प्रश्न उभा राहिला आणि त्यातूनच एका मंडपात दोन गणपतींची प्रतिष्ठापना करण्याची आगळीवेगळी परंपरा सुरू झाली. आज तब्बल ३२० वर्षांनंतरही ही परंपरा गोळवणकर (सावंत) कुटुंबीय श्रद्धेने जपत आहेत.
देवगड तालुक्यातील गोळवणकर कुटुंबीयांकडे इ.स. १७०४ पासून गणेशोत्सव साजरा करण्याची ही परंपरा असल्याचे सांगितले जाते. पूर्वी गणेशोत्सवासाठी मुंबईहून गलबताद्वारे श्रींची मूर्ती देवगडला आणली जात असे. एका वर्षी मात्र गणेशोत्सवाचा दिवस उजाडला तरी वादळी वारे आणि पावसामुळे मूर्ती घेऊन निघालेले गलबत देवगडला पोहोचले नाही.
आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या घरात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होऊन उत्सव सुरू झाला; मात्र गोळवणकर कुटुंबीय गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते. अखेर दुपारच्या सुमारास त्यांनी देवगड येथील गणेश चित्रशाळेतून मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली. त्यानंतर काही वेळातच समुद्रमार्गे मुंबईहून आणलेली मूर्ती घेऊन गलबत बंदरात दाखल झाले.
या अनपेक्षित प्रसंगानंतर घरातील ज्येष्ठ मंडळींनी विचारविनिमय केला आणि ब्राह्मणांचा सल्ला घेतला. गलबतातून आणलेल्या श्रींच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करावी, असा सल्ला मिळाल्यानंतर एकाच मंडपात दोन गणपतींची पूजा करण्याची परंपरा रूढ झाली. काळाच्या ओघात अनेक पिढ्या बदलल्या, उत्सवाचे स्वरूप बदलले; पण या परंपरेला मात्र गोळवणकर कुटुंबीयांनी जपून ठेवले.
गणेशोत्सवाच्या या परंपरेला गौरीपूजनाचीही भक्तिमय जोड आहे. गणेशोत्सवाचे अकरा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी घरातील वातावरण उत्साहाने भारून जाते. गौरीपूजनाच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन करतात.
फुगड्या, भजन, ढोलपथक, लहान मुलांसाठी मनोरंजक खेळ तसेच महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’सारख्या विविध कार्यक्रमांमधून उत्सवाला पारंपरिकतेसोबतच आनंदाची किनार लाभते. गौरीपूजनाच्या दिवशी कुटुंबीय एकत्र येऊन पारंपरिक फुगड्या व भजनाच्या माध्यमातून गौराईचा जागर करतात. तसेच याच दिवशी गौराईला नवीन नवस बोलण्याची आणि पूर्वी केलेले नवस फेडण्याचीही परंपरा आहे. ‘नवसाला पावणारी गौराई’ अशी कुटुंबीयांची श्रद्धा असून, त्यामुळे या उत्सवाला भावनिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभले आहे.










