LIVE UPDATES

अणुऊर्जेच्या विनाशापासून ‘सुंदर कोकणा’चा संदेश

चांदेलचा राजा गणपतीचा अनोखा देखावा चर्चेत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 10:59 AM
views 21  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : स्वप्नील लोके

 गणेशोत्सव हा केवळ भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव न राहता सामाजिक, पर्यावरणीय आणि भविष्यातील प्रश्नांवर जनजागृती करणारा उत्सव ठरू लागला आहे. याचीच प्रचिती कुणकेश्वर येथे नाणेरकर घराण्याच्या ‘चांदेलचा राजा गणपती’ समोर साकारण्यात आलेल्या आकर्षक चलचित्र देखाव्यातून येत आहे. ‘अणुऊर्जा : विनाश, धोका आणि हानी’ आणि त्याच्या समोर ‘सुंदर कोकण : आपली संस्कृती, निसर्ग आणि शांतता’ असा संदेश देणारा हा देखावा लक्षवेधी ठरत आहे.

या देखाव्यात एका बाजूला अणुऊर्जा प्रकल्पाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे मोठे टॉवर, त्यावर दर्शविण्यात आलेले धोक्याचे अणुकिरण चिन्ह, प्रकल्पाभोवतीची संरक्षक भिंत आणि ‘सावधान’ असा इशारा देणारा फलक यामुळे अणुऊर्जेच्या धोक्याची कल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

 दुसऱ्या बाजूला मात्र हिरवाईने नटलेला सुंदर कोकण उभा करण्यात आला आहे. डोंगररांगा, निसर्गरम्य परिसर, हिरवीगार शेती, छोटी-छोटी रंगीत घरकुले आणि उंच पवनचक्क्या यांच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग, शांतता आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचे सुंदर चित्र साकारण्यात आले आहे. देखाव्यातील पवनचक्क्यांमुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा संदेशही अधोरेखित होतो.

विशेष म्हणजे हा देखावा केवळ प्रतिकृतींचा संच न राहता एका विचाराची मांडणी करतो. एका बाजूला अणुऊर्जा प्रकल्पाचे संभाव्य धोके दाखविताना दुसऱ्या बाजूला निसर्ग, संस्कृती, हिरवाई आणि पवनऊर्जेने सजलेला शांत कोकण दाखविण्यात आला आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासोबतच पर्यावरणाबाबत विचार करण्याचा संदेश या देखाव्यातून दिला जात आहे.

देखाव्याच्या रचनेत बारकाईने केलेले काम विशेष आकर्षण ठरते. अणुऊर्जा प्रकल्पाची रचना, पवनचक्क्यांचे प्रतिरूप, छोट्या घरकुलांची मांडणी, डोंगर-पहाडांचे दृश्य आणि पार्श्वभूमीवरील निसर्गचित्र यांचा एकत्रित वापर करून देखावा साकारण्यात आला आहे. घरकुलांपासून पवनचक्क्यांपर्यंत प्रत्येक छोट्या प्रतिकृतीतून कोकणातील जीवनशैली आणि निसर्गाशी असलेले नाते दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 आज घरे वेगळी, पण गणपती एकच !
 या देखाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाणेरकर घराण्याची एकत्रित गणेशभक्तीची परंपरा. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत असलेल्या या घराण्यातील आज प्रत्येक कुटुंबाने स्वतंत्र घरे उभारली असली तरी गणरायाच्या भक्तीत आजही एकजूट कायम आहे.

सद्यस्थितीत या परंपरेत सहभागी असलेल्या सुमारे ११ ते १२ कुटुंबांचा हा गणपती म्हणून ‘चांदेलचा राजा’ गणपतीची ओळख आहे. स्वतंत्र संसार आणि स्वतंत्र घरे असूनही गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही कुटुंबे एकत्र येतात. त्यामुळे हा गणपती केवळ एका घराचा न राहता नाणेरकर कुटुंबीयांच्या एकजुटीचे आणि आपुलकीचे प्रतीक बनला आहे.

भक्ती, कुटुंबाची एकजूट, कोकणचा निसर्ग आणि पर्यावरणाचा संदेश यांचा सुंदर संगम साधणारा ‘चांदेलचा राजा’ गणपतीसमोरील हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि गणेशभक्त आवर्जून भेट देत आहेत. 

गणरायाच्या चरणी नतमस्तक होताना ‘कोकण जपूया, निसर्ग जपूया आणि भावी पिढीसाठी सुंदर व सुरक्षित पर्यावरण ठेवूया’, असा संदेश या देखाव्यातून प्रभावीपणे देण्याचा संकल्प पुंडलिक नाणेरकर प्रकाश नाणेरकर सुशांत नानेरकर सुरेश नानेरकर सागर नानेरकर सुजल नाणेरकर दुर्गेश नानेरकर गौरांश नाणेरकर ओम नानेरकर आणि मंडळीनी  देण्याचा प्रयत्न केला .