LIVE UPDATES

७८ वर्षे... एकच श्रद्धा, एकच राजा - ‘शिरगावचा राजा’

भक्तांच्या मनात अढळ स्थान; छोट्याशा रोपट्याचा आज श्रद्धेच्या वटवृक्षात विस्तार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 10:50 AM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : स्वप्नील लोके 

 तब्बल ७८ वर्षे...! काळ बदलला, पिढ्या बदलल्या, उत्सवाचे स्वरूप बदलले; मात्र शिरगाव बाजारपेठेतील ‘शिरगावचा राजा’ याच्यावरील भाविकांची श्रद्धा आजही तितकीच अढळ आहे. 

भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणराया अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या शिरगावच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांची पावले बाजारपेठेकडे वळतात. ७८ वर्षांपूर्वी लावलेले सार्वजनिक गणेशोत्सवाचे छोटेसे रोपटे आज श्रद्धेच्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.

शिरगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ गावातील जुन्या जाणकार मंडळींच्या पुढाकारातून रोवली गेली. बाजारपेठेतील रामभाऊ त्रिभुवने यांच्या घरात पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ‘सम्राट तरुण मंडळा’ने ही परंपरा पुढे नेली. 

पुढे १९७९ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून शिरगाव बाजारपेठेतील एस.टी. बसस्थानकासमोरील कॉम्प्लेक्समध्ये हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे.

पहिल्या मूर्तीपासून आजच्या ‘राजा’पर्यंत...

शिरगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील पहिली श्रींची मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार जनार्दन (बाबा) वाड्ये यांनी साकारली होती. यंदाची श्रींची मूर्ती कणकवली तालुक्यातील असलदे दिवाणसानेवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार सत्यवान पांचाळ यांच्या चित्रशाळेत साकारण्यात आली आहे. आकर्षक सजावटीची जबाबदारी दिशा साटम, तर विद्युत रोषणाईची जबाबदारी उमेश अतभवणे सांभाळत आहेत. श्रींच्या दैनंदिन पूजा-अर्चेची जबाबदारी विवेक जामसंडेकर सांभाळत आहेत.

 ७८ वर्षांत बदलली नाही एक परंपरा

काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या; मात्र मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. स्थापनेपासून श्रींची मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार करण्याची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गणेश चित्रशाळांमधून मूर्ती आणून स्थानिक मूर्तिकारांच्या कलेला व्यासपीठ देण्याची परंपराही मंडळाने जपली आहे.

गणरायाच्या उत्सवात साऱ्यांचा सहभाग ‘शिरगावचा राजा’चा उत्सव हा केवळ गणेशभक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच रिक्षा चालक-मालक संघ, राजे ग्रुप, मित्र शिरगाव, व्यापारी संघटना आणि आर.के. फाउंडेशन यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोप्याची वीणही अधिक घट्ट होत आहे.

यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद राजाराम साटम भूषवित आहेत.

भक्तीच्या जागरात रंगते शिरगाव बाजारपेठ

श्रींच्या आगमनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत शिरगाव बाजारपेठेत भक्तीचा जागर अनुभवायला मिळतो. दररोज सकाळी आणि सायंकाळी पूजा-अर्चा व आरती, दुपारी नैवेद्य तसेच भजन, कीर्तन आणि समाजप्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजाही आयोजित केली जाते.उत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी देवगड पोलीस ठाणे, शिरगाव पोलीस दूरक्षेत्र आणि होमगार्ड यांचे विशेष सहकार्य मंडळाला लाभते.

‘नवसाला पावतो’... श्रद्धेची हीच ओळख

 ‘शिरगावचा राजा नवसाला पावतो’ अशी भाविकांची श्रद्धा आहे. भक्ताच्या हाकेला धावणारा आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणारा गणराय म्हणून त्याची ख्याती पंचक्रोशीत दूरवर पसरली आहे. त्यामुळे उत्सवकाळात सर्वसामान्य भाविकांपासून लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारीही गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात.

७८ वर्षे म्हणजे केवळ काळाचा प्रवास नाही; ती असंख्य भाविकांच्या श्रद्धेची, पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या परंपरेची आणि शिरगावच्या सामाजिक एकोप्याची कहाणी आहे. म्हणूनच शिरगाव बाजारपेठेतील हा गणराय आजही केवळ ‘राजा’ नाही, तर गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य साक्षीदार बनून उभा आहे.