LIVE UPDATES

'त्या' कंपनीला दिलासा

सह धर्मादाय आयुक्तांनी अर्ज फेटाळला, जैसे थे आदेशही रद्द
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 05, 2026 14:04 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : शहरातील गवळी तिठा येथील वैश्य भवनमधील हॉल खासगी कंपनीला भाड्याने देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेला अर्ज सह धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांनी नामंजूर केला असून यापूर्वी दिलेला जैसे थे ठेवण्याचा आदेशही रद्द केला आहे. त्यामुळे 'ग्रोबिग टेक्नॉलॉजी' कंपनीला लिव्ह ॲण्ड लायसेन्स करारानुसार हॉलचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भवनमधील हॉल 'ग्रोबिन टेक्नॉलॉजी' कंपनीला भाड्याने देण्याचा निर्णय तसेच कंपनीला हॉलमध्ये अंतर्गत कामकाज व वापर करण्यास मनाई व्हावी, यासाठी रमेश भाट आणि सौ. पुष्पलता कोरगावकर यांनी सह धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील प्राथमिक सुनावणीनंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हॉलमध्ये कोणतेही काम करू नये, असा आदेश देण्यात आला होता. मात्र, अंतिम सुनावणीनंतर सह धर्मादाय आयुक्तांनी २७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशात अर्ज फेटाळून लावत पूर्वीचा जैसे थे आदेशही रद्द केला. निकालपत्रात सह धर्मादाय आयुक्तांनी नमूद केले आहे की, सन १९९५ पासून कार्यरत असलेल्या डी-फॅक्टो विश्वस्तांनी न्यासाच्या जागेवर वेळोवेळी बांधकाम केले असून त्या इमारतीतील विविध भाग वेगवेगळ्या व्यावसायिक कारणांसाठी भाड्याने देण्यात आले आहेत. त्याबाबत यापूर्वी कोणताही वाद निर्माण झालेला नाही. त्याचप्रमाणे 'ग्रोबिग टेक्नॉलॉजी' कंपनीलाही लिव्ह ॲण्ड लायसेन्स कराराद्वारे जागा देण्यात आली असून त्यामुळे न्यासाच्या मालमत्तेचा अपव्यय, नुकसान किंवा अनुचित हस्तांतरण होण्याचा कोणताही धोका प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे म्हटले आहे.