
सावंतवाडी : विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने मतदार संघातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदांचा डाटा द्यावा यासंदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक घेऊन रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या सावंतवाडी विधानसभा आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केले.
शुक्रवारी झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, सुदन कवठणकर, विजय नाईक, अपर्णा सातोस्कर, सुजाता पडवळ, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा आरोग्य अधिकारी लळीत, तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, राहुल गुरव, वेंगुर्ले गटविकास अधिकारी व्ही.एन.नाईक, सावंतवाडी गटविकास अधिकारी निलेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, विलास नाईक, सुकन्या टोपले आदी यावेळी उपस्थित होते.
सावंतवाडीच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निकाली लावल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचे जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी नगरसेवक राजू मसुरकर, रुग्ण कल्याण कृती समितीचे एन बी रेडकर यांनी अभिनंदन केले. यावेळेस विधानसभा मतदार संघाबरोबर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर तसेच अन्य रिक्त पदाचा मुद्दा उपस्थित झाला. आरोग्य विभागाकडून हा डाटा सादर करण्यात आला.
जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त असून काही ठिकाणी तर आरोग्य कर्मचारी नाहीत त्यामुळे एखाद्या रुग्णाला तब्येत बरी नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तर दोडामार्ग येथील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला पण तेथील पदेच भरण्यात आली नाहीत. मळेवाड रेडी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्याच्या सुविधा नाहित तर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन रूम आहे. पण, तेथील कर्मचाऱ्यांची भाषा फार उद्धट आहे. अशा तक्रारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आयोजित एकात्मिक आरोग्यवर्धीनी समितीच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत.
कुंभवडे सह अन्य काहि आरोग्य केंद्र जवळच्या आरोग्य केंद्राना जोडण्यात येणार असून त्याचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी योग्य घरे नाहीत त्यामुळे त्यांना बाहेरून येऊन जाऊन करावे लागते या घराची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने याचा सर्व भार बी. एम. एस. डॉक्टरांवर येतो त्यामुळे लवकरात लवकर एमबीबीएस डॉक्टर भरले जावेत अशी मागणी करण्यात आली.
आमदार केसरकर यांनी महात्मा फुले आरोग्य योजने बाबत ही आढावा घेतला तसेच आरोग्य केंद्राच्या बाबतीत ज्या काही त्रुटी आहेत तसेच कर्मचारी संख्या कमी आहे याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ताई सुविधा कमी आहेत त्या लवकरच भरल्या जातील वेंगुर्ले येथे स्त्रीरोग तज्ञ नसल्याने तेथे प्रस्तुती होत नाहीत असे यावेळी आमदार केसरकर यांच्या निदर्शनास अजून देण्यात आले.
शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी रूग्ण नेण्यात आला होता. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याचे उध्दट उत्तर दिले हे शोभनीय नाही. असे सुदन कवठणकर यांनी स्पष्ट केले. तसेच मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज व्हावे असे आवाहन ही केसरकर यांना कवठणकर यांनी केले.
उपजिल्हा रुग्णालयाची जागा ही शासनाची होती. त्या सातबारावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख आहे. त्यातील ५० गुंठे जागा आम्ही शासन म्हणून राजघराण्याला दिली असे आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत स्पष्ट केले. बैठकीत राऊळ यांनी सभेच्या सुरूवातीलाच सावंतवाडी राजघराण्याने मल्टीस्पेशलिस्टसाठी विनामूल्य जमीन दिली, असे सांगत राजघराण्यासह हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला.
ठराव मांडत असताना काही ठिकाणी चुकीचे छापून आले आहे. ही जमीन शासनाची आहे. सातबारा शासनाच्या मालकीचा आहे. त्यामुळे शासन स्तरावर विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन ५० गुंठे जागा शासन म्हणून त्यांना दिली, असे सांगत ही रखडलेली प्रक्रिया सुटण्यासाठी त्यांनी सकारात्मक अॅफीडेव्हीट दिले. त्यामुळे त्यांचे आभार माना, अशा सूचना केसरकर यांनी त्यांना केल्या. सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी सावंतवाडीच्या राजकारणात दिलेली ५० गुंठे जमीन ही पुन्हा शासनाने त्यांच्याकडून बाजारभावाने खरेदी करावी आणि त्या ठिकाणी पार्किंग आणि कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
याबाबत आपल्याला स्वतः राजे खेमसावंत भोसले यांनी सकारात्मक होकार दर्शविला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करावी, अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी फक्त ८५ हजार रुपये पगार असल्यामुळे या ठिकाणी डॉक्टर हजर होत नाही. त्यामुळे त्यांचा पगार वाढवण्यासाठी प्रयत्न करा. एखादा उद्योगपतीकडून जर महिन्याला सहा लाख रुपये उपलब्ध करून द्या. सगळे डॉक्टर आपण आणतो, असा त्यांनी दावा केला.
यावेळी केसरकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. या ठिकाणी जी जमीन दिली आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच जर पुन्हा ती जमीन विकत घेत असेल तर ते चुकीची ठरेल. त्यामुळे असे होणार नाही. पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात आम्ही निर्णय घेऊ, ज्या ठिकाणी इमारत उभारल्यानंतर तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे, तशा सूचना आपण संबंधित विभागाला देणार आहोत. आराखडा मंजूर करताना ही गोष्ट प्राधान्याने घेतली जाईल असे केसरकर म्हणाले










