LIVE UPDATES

'एमएनजीएल' कृपेनं चिखलाचं राज्य !

तलाव काठ, सर्वोदयनगरातील नागरिकांचा संताप
Edited by: विनायक गांवस
Published on: June 04, 2026 20:18 PM
views 101  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात गॅस पाईपलाईनसाठी गेले काही महिने जोरदार काम सुरू आहे. जून महिना जवळ आल्यान पावसाळ्यापूर्वी हे चर बुजविण्यात येतील असं आश्वासन देखील दिले होते. मात्र, मोती तलाव परिसर, सर्वोदयनगर, जुनाबाजार आदीसह काही ठिकाणी आज पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून अपघाताला आयत आमंत्रण मिळत आहे. 

लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांना तर इथून पायी चालत जाणं देखील अवघड होऊन बसलं आहे. दुचाकीवरुन ये-जा करण्याचा तर विचारही त्यांनी न केलेला बरा अशी परिस्थिती आहे. नगराध्यक्षांकडून पावसाळ्यापूर्वी खडीकरण होईल असं आश्वासन दिलं होतं.‌ मात्र, पावसाला सुरुवात होऊन देखील परिस्थिती जैसे थेच आहे. तर ज्या ठिकाणी सर्वात पहिली गॅस कंपनीकडून काम केलं गेल‌ त्या सर्वोदयनगर भागातली  परिस्थिती भिषण आहे. इतर प्रभागात त्या प्रमाणात खडीकरण, डांबरीकरण झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोदयनगर, सालईवाडा, जुनाबाजार, रामेश्वर प्लाझा मोती तलाव लाईन येथे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. चरात गाड्या रूतण्याचे प्रकार होत आहेत. दुकानात येणारा ग्राहक 'चिखलांच्या पावलां'नी आतमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे नाहक मनस्ताप सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, आजच याबाबत माहिती घेतली असून माती खाली दाबली जावी यासाठी चर उंचवठे करुन ठेवण्यात आला होता. यावरून लोक पडतील म्हणून लोकप्रतिनिधींनी ते सपाटीकरण करण्याची मागणी केली. त्यानुसार काम केल्यानंतर काही ठिकाणी काही चर खाली बसलेत. पावसापूर्वी खडीकरण व डांबरीकरण करण्याचे आदेश ठेकेदारांना दिलेत. शहरातील एकुण कामांपैकी २ काम पूर्ण असून ४ कामांचे खडीकरण झाल आहे. २ कामाचं डांबरीकरण शिल्लक असून ४ काम अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली.