
कणकवली : कणकवली शहरात ठिकठिकाणी असणारे अतिक्रमण हटविणार असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास नगरपंचायतीची टीम मुख्याधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑन फिल्ड उतरली. सर्वप्रथम कणकवली शहराच्या मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना हद्दीच्या आत येणारे अतिक्रमण हटविण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नगरपंचायतीची टीम महामार्गावरील उड्डाणपूलखालील जागेत दाखल झाली. तेथे देखील सर्व विक्रेत्यांना आपापले स्टॉल, दुकाने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी स्टॉल धारक व नगरपंचायत कर्मचारी यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. तर मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आक्रमक रूपही कणकवलीकरांना बघायला मिळाले. दरम्यान अतिक्रमण हटविण्याला आमचा विरोध नाही. मात्र, आम्हाला हक्काची जागा द्या, अशी मागणी भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदीने यांनी केली आहे.
सद्यस्थितीत विक्रेत्यांना आपापली दुकाने, स्टॉल हटविण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रत्यक्षात कधी राबविली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.











