
आडेलीतील त्या विहिरीचं काम 15 दिवसांत होणार
कुडाळ : आडेली ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पाणी समस्येबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच, स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या वृत्ताची दखल घेत आडेली गावच्या सरपंच सौ. यशश्री विष्णू कोंडसकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर ग्रामपंचायतीची अधिकृत बाजू मांडली आणि वस्तुस्थिती स्पष्ट केली.
या पाहणी दौऱ्यावेळी आणि बैठकीत सरपंच यशश्री विष्णू कोंडसकर यांच्यासह उप सरपंच परेश हळणकर व प्रवीण गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्वांनी प्रत्यक्ष विहिरीच्या ठिकाणी जाऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.
गावात पाणी उपलब्ध, मात्र पातळी खालावली : सरपंच
सरपंच यशश्री कोंडसकर यांनी सांगितले की, "आंबेडकर नगर भागात पाण्याचा कोणताही तीव्र तुटवडा भासत नाही. या ठिकाणी एक मुख्य सार्वजनिक विहीर असून, येथील रहिवासी दैनंदिन वापरासाठी याच विहिरीच्या पाण्याचा आधार घेतात. सद्यस्थितीत कडक उन्हाळ्यामुळे या विहिरीतील पाण्याची पातळी नक्कीच खाली गेली आहे, परंतु लोकांची पाण्यासाठी वणवण होत आहे असे नाही. काही नागरिक आपल्या गरजेनुसार स्वतःहून पाणी विकत घेत असतील, मात्र सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक विहिरीवर पाणी उपलब्ध आहे."
ज्या नवीन विहिरीच्या अर्धवट कामावरून आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणावरून नागरिकांमध्ये कमालीचा संताप होता, त्याबाबत सरपंच यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे.
"ज्या विहिरीचे बांधकाम सध्या तांत्रिक कारणांमुळे थांबलेले आहे, त्याबाबत कंत्राटदाराला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या १५ दिवसांत हे विहिरीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जाईल," असे जाहीर आश्वासन सरपंच यशश्री विष्णू कोंडसकर यांनी दिले.
वृत्त प्रसिद्ध होताच अवघ्या काही तासांत सरपंच यशश्री कोंडसकर,उप सरपंच परेश हलणकर, विष्णू कोंडसकर आणि प्रवीण गडेकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आंबेडकर नगरमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील १५ दिवसांत हे काम खरोखरच पूर्ण होते का आणि पावसाळ्यापूर्वी या विहिरीचा धोका टळतो का, याकडे आता संपूर्ण आडेली ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत.











