LIVE UPDATES

शेअर मार्केट घोटाळा | प्रीती राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

तपासाला वेग आल्याचे न्यायालयात स्पष्ट
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 19:01 PM
views 315  views

ठाणे : बहुचर्चित 180  कोटींहून अधिकच्या आर्थिक  फसवणूक प्रकरणातील आरोपी प्रीती राणे यांच्या जामीन अर्जावर आज माननीय ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान गुंतवणूकदारांच्या वतीने अॅड. राजेश दत्तू काकड उपस्थित होते. सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर करण्यात आलेल्या तपास अहवालातून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची, विविध बँक खात्यांची, मालमत्तांची तसेच गुंतवणूकदारांच्या पैशांच्या प्रवाहाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तपास यंत्रणेकडून या प्रकरणात अधिक गांभीर्याने तपास सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून अॅड. राजेश काकड यांनी तपासातील विलंब, त्रुटी आणि आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्याच्या कथित प्रयत्नांविरोधात सातत्याने पाठपुरावा केला आहे. विविध कायदेशीर पत्रव्यवहार, तक्रारी, निवेदने आणि न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून त्यांनी तपास यंत्रणेला आवश्यक कारवाई करण्यास भाग पाडल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये व्यक्त होत आहे. गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, आज न्यायालयात दिसून आलेली तपासातील प्रगती ही केवळ नियमित प्रक्रियेचा भाग नसून सातत्यपूर्ण कायदेशीर दबाव आणि पाठपुराव्याचे फलित आहे. अनेक महिन्यांपासून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या शेकडो गुंतवणूकदारांसाठी आजची सुनावणी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी हा लढा अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट करत आरोपींना शिक्षा होणे आणि गुंतवलेली रक्कम परत मिळणे हेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. 

या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि तपासातील घडामोडींवर आता सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. न्यायाच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडल्याची भावना न्यायालय परिसरात व्यक्त करण्यात आली.