LIVE UPDATES

प्राजक्ता माळींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 'आपला बाजार' मॉलवर FSSAI ची धडक धाड

ग्राहकांना काढले बाहेर | चौकशी सत्र सुरू!
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 19, 2026 20:10 PM
views 2010  views

कुडाळ : कुडाळ मध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच १७ जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अत्यंत दिमाखात आणि मोठ्या थाटामाटात शुभारंभ झालेल्या कुडाळ येथील 'आपला बाजार' या भव्य मॉलवर आज अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) पथकाने थेट 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FSSAI चे पथक आज अचानक मॉलमध्ये धडकले. अधिकाऱ्यांनी आत पाऊल टाकताच सर्वात आधी मॉलमध्ये खरेदी करत असलेल्या ग्राहकांना तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर मॉलचे मुख्य दरवाजे बंद करून आतमध्ये चौकशीचा धडाका सुरू करण्यात आला. सध्या पथकाकडून मॉलच्या व्यवस्थापनासह संपूर्ण स्टाफची कसून चौकशी केली जात असून, अन्नपदार्थांचे परवाने, साठा आणि कायदेशीर कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे.

अवघ्या ४८ तासांपूर्वी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रिबन कापून सुरू झालेल्या मॉलवर अशी कोणती मोठी आफत आली की थेट अन्न व भेसळ अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागली? सध्या कुडाळमध्ये चांगलाच जोर धरला आहे. उद्घाटनाची चर्चा ओसरते ना ओसरते, तोच मॉलवर सरकारी पथकाची धाड पडल्याची बातमी कुडाळ शहरात वाऱ्यासारखी पसरली. ही धडक कारवाई पाहण्यासाठी आणि नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी मॉलच्या बाहेर स्थानिक नागरिकांची आणि बघ्यांची 'तोबा गर्दी' जमली आहे. 

ही कारवाई नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, याबाबत FSSAI च्या अधिकाऱ्यांनी अद्याप प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, दोनच दिवसांत झालेल्या या  कारवाईमुळे चर्चा आता कुडाळच्या गल्लोगल्लीत रंगू लागली आहे.