
सावंतवाडी : तालुक्यातील विविध विभागांचे प्रलंबित प्रश्न आणि अधिकाऱ्यांची नकारात्मक भूमिका यामुळे त्रस्त झालेल्या पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेत तीव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींप्रमाणेच अधिकारीही केवळ आश्वासने देत असून, आमच्या विचारलेल्या प्रश्नांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत जनतेचे प्रश्न सुटणार नसतील तर आम्ही येथे फक्त वडापाव खाण्यासाठी येतो का ? असा जळजळीत सवाल करत सदस्यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील सर्व विभागांच्या समस्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तातडीने 'आमसभा' आयोजित करून सर्व अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
ही मासिक सभा सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटविकास अधिकारी निलेश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत उपसभापती गौरव मुळीक यांनी कृषी, पाणीपुरवठा आणि वन विभागाच्या कारभारावर जोरदार तोफ डागली. पीक विमा कंपनीकडून काही क्षेत्र वगळले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कृषी विभागाने याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना परतावा मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, निरवडे येथील हवामान केंद्र चुकीच्या ठिकाणी असल्याने ते चुकीचे तापमान दाखवत आहे. यामुळे नेमळे आणि मळगाव भागातील आंबा बागायतदारांचे नुकसान होत असल्याने तेथे नवीन हवामान केंद्र उभारण्याची सूचना त्यांनी केली. जलजीवन मिशनच्या कामांवरूनही सभेत मोठा गदारोळ झाला. सदस्य प्राजक्ता केळुस्कर यांनी निधीअभावी जलजीवनची कामे ठप्प असल्याकडे लक्ष वेधले. यावर उपसभापती मुळीक यांनी आक्रमक होत, तिलारी नळ योजना कोणासाठी राबवली जात आहे ? सांगेली येथील मंजूर काम वेर्ले गावात कोणाच्या सांगण्यावरून हलवले, असा सवाल केला. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापती सुस्मिता जाधव यांनी जलजीवनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या ३० जून रोजी विशेष बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
बैठकीत वन विभाग आणि एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारावरही सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. मळगाव घाटीतील गवारेड्यांच्या उपद्रवाबाबत वन विभागाच्या प्रतिनिधींनी काटेरी कुंपण घातल्याचा दावा केला. मात्र, त्याचा कोणताही पुरावा त्यांना देता आला नाही. वारंवार बैठकीला अधिकारी बदलून येत असल्यामुळे आणि नुकसानीच्या भरपाईबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे सदस्य जितेंद्र गावकर आणि इतर लोकप्रतिनिधी कमालीचे संतप्त झाले. दुसरीकडे, सावंतवाडी बसस्थानकाच्या दुरवस्थेवर बोलताना उपसभापती मुळीक यांनी या बसस्थानकाची परिस्थिती पाहून लाज वाटते, अशा शब्दांत एसटी प्रशासनाचे वाभाडे काढले. स्थानकातील अस्वच्छता दूर करावी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस फेऱ्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रणाली टिळवे व प्राजक्ता केळुस्कर यांनी केली. तसेच बांदा येथील पूर परिस्थितीबाबत महेश धुरी यांनी प्रश्न उपस्थित केला. या संपूर्ण चर्चेत मायकल डिसोजा, प्रशांत सुकी, सदानंद राणे आणि मराठे यांनी सहभाग घेतला.
तालुक्यात शेवटची आमसभा नेमकी कधी झाली ? याची साधी माहितीही प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. केवळ विभागीय बैठकांमधून प्रश्न सुटत नसल्याने आमसभा हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे जितेंद्र गावकर व केळुस्कर यांनी नमूद केले. यावर बोलताना सभापती सुस्मिता जाधव यांनी स्पष्ट केले की, आमसभा घेण्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया व टिप्पणी तयार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्याकडून तारीख आणि वेळ निश्चित होताच तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी तातडीने आमसभा आयोजित केली जाईल.










