
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्राथमिक शिक्षक अध्यापनाच्या वेळेत मोबाईलवर व्हॉट्सॲप वापरत असल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोठ्या सावंत यांनी करत शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी मराठी शाळांतील पटसंख्या घटत असताना शिक्षक अध्यापनाऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असतील तर विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारणार कसा, असा संतप्त सवाल त्यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला.
या आरोपाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी "उद्याच परिपत्रक काढा आणि शैक्षणिक वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी घाला" असे स्पष्ट आदेश संबंधित प्रशासनाला दिले. अध्यापनाच्या काळात मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर समज देण्याबरोबरच कठोर भूमिका घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.
बुधवारी (५ ऑगस्ट) आंबोली ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या मासिक सभेत हा विषय चांगलाच गाजला. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, विविध विषय समित्यांचे सभापती, सदस्य आणि खातेप्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात काही शाळांच्या वर्गखोल्या कोसळल्याच्या घटनांवरूनही सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.
सभेच्या सुरुवातीलाच सदस्य सुमेधा पाताडे यांनी सभेचे प्रोसेडिंग उशिरा मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी कायद्यात ठरावीक मुदतीची तरतूद नसल्याचे सांगताच सदस्य संदेश सावंत आक्रमक झाले. "कायद्यावर बोट ठेवणार असाल तर आम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ. सदस्यांना गृहीत धरू नका; अजेंड्यासोबत प्रोसेडिंग देणे आवश्यक आहे," असा इशारा त्यांनी दिला.
गोवा येथील बांबूळी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या सिंधुदुर्गातील रुग्णांच्या सोयीसाठी आणखी एका संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सदस्य मनोज रावराणे यांनी केली. तसेच बांबूळी येथे कायमस्वरूपी "सिंधुदुर्ग कक्ष" स्थापन करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. यावर सकारात्मक भूमिका घेत लवकरच अतिरिक्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले.
यावेळी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर आला. ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनोज रावराणे यांनी एसटी प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडचण होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
"व्हॉट्सॲपवर ऑनलाईन शिक्षक, मग शिक्षणाचा दर्जा वाढणार कसा?"
ज्येष्ठ सदस्य संदेश उर्फ गोठ्या सावंत यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे शिक्षण विभागातील शिस्त, जबाबदारी आणि शाळांतील अध्यापन पद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. शाळेच्या वेळेत मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय आता प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











