
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील नाधवडे ग्रामपंचायत हद्द ते शिडवणे फाटा दरम्यान काही दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या महिनाभरात उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे कॉक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.या मार्गावरील तळेरे-वैभववाडी पर्यंतचे बहुतांश काम पुर्ण झाले आहे.काही ठिकाणी काम होण बाकी आहे,तिथे डांबरीकरण करण्यात आले आहे.हे काम महीनाभरापुर्वीच करण्यात आले होते.मात्र तिथे मोठं मोठे खड्डे पडले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून अनेक वाहने खड्डे चुकवताना हेलकावे खात असल्याचे चित्र आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी असल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी संबंधित विभागाने तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करून दोषी ठेकेदाराची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.










